शिवानंद महाविद्यालयात अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन
कागवाड : मराठी साहित्यातील प्रतिभावंत म्हणून अण्णा भाऊ साठे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राबाहेरही परिचित आहेत. साहित्यातील भरीव योगदानामुळे त्यांना लोकशाहीर, साहित्यसम्राट, साहित्यरत्न म्हणून ओळखले जातात. ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे हे त्यांच्या समग्र लिखाणाचे सूत्र होते. मार्क्सवादाचा विचार घेऊन ते कम्युनिस्ट चळवळीत सक्रिय झाले. अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून समाजाच्या तळागाळातील शोषित वंचित घटकांच्या जीवनाचे चित्रण केले आहे असे प्रतिपादन प्रा. अमोल पाटील यांनी केले.
कागवाड येथील शिवानंद महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अमोल पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख प्रा. अशोक आलगोंडी होते. प्रथम अण्णा भाऊ यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रा. अशोक आलगोंडी यांनी अण्णा भाऊ साठे यांचे जीवन व कार्य याविषयी माहिती दिली. प्रा. एम. एल. कोरे यांनीही अण्णा भाऊच्या साहित्याचा आढावा घेत म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द. न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले.
यावेळी मराठी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशालाक्षी माळी यांनी केले तर आभार रुचिता क्षीरसागर यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta