नागपंचमीला देव : वर्षभर शत्रू आहे का?
निपाणी (विनायक पाटील) : सर्प म्हटले की भल्याभल्यांना अंगावर शहारे येऊन, घाम फुटतो, भीती वाटते. भीतीपोटी तत्काळ सर्पास मारण्याचा निर्णय घेतला जातो. परंतु कुर्लीतील (ता. निपाणी) छायाचित्रकार व सर्पमित्र विजय नार्वेकर यांच्याशी संपर्क साधल्यास तत्काळ साप पकडतात. त्यांनी आतापर्यंत 1000 पेक्षा अधिक सर्पांना जीवदान दिले आहे. आजवर नाग, घोणस, मण्यारसह विषारी व बिनविषारी सर्पांना अलगद पकडून अधिवासात सोडले आहे.
2019 च्या महापुरानंतर कुर्ली परिसरात शेकडो विषारी सर्पांना जीवदान दिले. त्यासाठी शिवाजी कागले – मेस्त्री, वनमित्र दिनकर चौगुले पन्हाळा यांचे सहकार्य लाभले. निपाणी, कुर्ली, आप्पाचीवाडी, आणूर, म्हाकवे, सौंदलगा, नांगनूर, हणबरवाडी परिसरातून 60 नाग, मण्यार, 50 घोणस पकडले आहेत. याशिवाय तस्कर, गवत्या, दवड, हरणटोळ, नानेटी, कवड्या जातीच्या 900 हून अधिक सर्पांना जीवदान मिळाले. नाग, घोणस, मण्यार, चिट्ट्यासह इतर प्रजातींचे सर्प पकडून जीवदान दिले. भविष्यात तालुक्यात सर्पोद्यान झाल्यास जखमी पक्षी, प्राणी, सर्पांना उपचारासाठी ठेवता येईल.
—————————–
सर्प हा शेतकर्याचा मित्र
धामण साप हा तर शेतकर्याचा खरा मित्र आहे. शेतातील पिकाचे उंदीरापासून हा संरक्षण करतो. वर्षाला एक धामण साप 500 ते 600 उंदीर सहज खातो. त्यामुळे पिकाची नासाडी होऊ शकत नाही. त्यामुळे धामण सापाला पकडून दुसरीकडे चुकीचे आहे. त्यामुळे शेतकर्यानी धामण सापाचे संरक्षण करण्याची गरज आहे.
—————————–
’साप पकडण्यासाठी आमच्याही घरातून विरोध असतोच. पण तो झुगारून ज्यांच्या घरी येतो त्यांच्या घरी जाऊन साप पकडून दूरवर सोडून देतो. त्यावेळी अनेक नागरिक हात धुवायला साबण सुद्धा देत नाहीत शिवाय स्वत:च्याच दुचाकीने पेट्रोल खर्च करून विषारी सापांना दूरवर सोडावे लागते ही खंत आहे. या कारणामुळे अनेक सर्पमित्रांनी सर्व पकडणेही सोडून दिले आहे.’
– विजय नार्वेकर, सर्पमित्र, कुर्ली