सीमाभागातील कारखाने गळीत हंगामासाठी सज्ज : गावोगावी जनजागृती सुरू
निपाणी (संजय सूर्यवंशी) : रास्त आणि किफायतशीर भावाचे (एफआरपी) तुकडे करून शेतकर्यांना बिले देण्याची भूमिका कारखान्यांची असून त्यावर केंद्र व राज्य सरकारकडून कोणतीच भूमिका स्पष्ट झालेली नाही. या परिस्थितीत कर्नाटक महाराष्ट्र सीमाभागातील सहकारी व खासगी साखर कारखाने ऑक्टोबरपासून गळीत सुरू करत आहेत.
शेतकरी संघटनांनी एफआरपीच्या तुकड्याला विरोध केल्याने या प्रश्नावरून सीमाभागात आंदोलनाची चिन्हे आहेत.
दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने ऊसाच्या वजनावर परिणाम झाला आहे. सीमाभागात पुरामुळे झालेल्या नुकसानीमुळे ऊसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे. बेळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्र सीमाभागात सहकारी व खासगी असे 16 साखर कारखाने यावर्षीही गाळपाच्या तयारीत आहेत.
गेल्या वर्षी ऐन कोरोनात कारखान्यांनी संपूर्ण ऊसाचे गाळप करत सर्वाधिक कोटी क्विंटलच्या घरात साखरनिर्मिती केली. त्यामुळे कारखान्यांचा मागील हंगाम चांगला फायद्यात गेला आहे. यावर्षी सर्वच कारखान्यांचे बॉयलर पेटले असून आता ऑक्टोबरमध्ये प्रत्यक्ष गाळप हंगाम सुरू होणार आहे. यावर्षी प्रथमच इतक्या लवकर हंगाम सुरू होऊन तो लवकर संपणारही असल्याचे सांगितले जात आहे.
यावर्षी सीमाभागात ऊस उपलब्ध असला तरी पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे ऊसाचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे तेथील कारखाने आता इतर जिल्ह्यातील ऊस घेऊन जाऊन त्याचे गाळप करण्याची युक्ती लढवू शकतात. त्यातूनच ऊसाची पळवापळवी होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. सध्या गेल्या वर्षीच्या गाळप केलेल्या ऊसाच्या बिलाची बाकी देण्यावरून शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. एफआरपीचे तुकडे करून कारखाने बिले देत असल्याने शेतकर्यांत नाराजी आहे. त्यातून शेतकर्यांना कोणतीही देणी भागविता येत नसल्याने एकरकमी एफआरपी मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यासाठी शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे साखर कारखाने मात्र शासनाच्या भूमिकेकडे लक्ष देऊन आहेत. कारखान्यांनी अद्याप एफआरपीबाबत कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. पण, शेतकरी संघटनांनी आवाज उठविण्यास सुरूवात केल्याने ऐन हंगामाच्या तोंडावर वाद चिघळण्याचं भीती आहे. गेल्या वर्षी बहुतांश कारखान्यांनी आपापली एफआरपी रक्कम पूर्णपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोच पायंडा यावर्षीही राहण्याची शक्यता आहे.
Check Also
बेडकिहाळ दसरा महोत्सवात श्रीनय बाडकरची हॅट्ट्रिक
Spread the love निपाणी : बेडकिहाळ दसरा महोत्सवामध्ये स्वर्गीय श्री. अशोक टी. नारे एजुकेशन अँड …