निपाणी : रस्त्यात नादुरुस्त होऊन थांबलेल्या ट्रकवर आयशर मालवाहतूक ट्रक आदळल्याने झालेल्या विचित्र अपघातात आयशर वाहनाचा क्लिनर अनिल गंगाराम कुलमनी (वय ३०) रा. ईदलहोंड ता. जि. बेळगाव हा जागीच ठार झाला. तर चालक ब्रह्मा शिवाजी कोले रा. ईदलहाेंड हा गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास झाला. घटनेची नोंद शहर पोलिसात झाली असून नादुरुस्त होऊन थांबलेल्या ट्रक चालकाने अपघातानंतर पळ काढला असून पोलिसांनी त्याचा शोध जारी ठेवला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर निपाणी हद्दीतील ३० नंबर बिडी कारखानासमोर कोल्हापूरहुन बेळगाव येथे जाणारा मालवाहू ट्रक नादुरुस्त होऊन थांबला होता. याचवेळी रात्री अकराच्या सुमारास आयशर ट्रक चालक ब्रह्मा शिवाजी कोल्हे हा मयत क्लिनर अनिल गंगाराम कुलमनी यांच्यासमवेत बेळगावच्या दिशेने जात होता. यावेळी चालक ब्रह्मा यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने नादुरुस्त होऊन थांबलेल्या ट्रकला ब्रह्मा याच्या आयशर वाहनाची मागून जोराची धडक बसल्याने वाहनाच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. यावेळी क्लिनर कुलमनी हा जागीच ठार झाला, तर ब्रम्हा गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच रस्ते देखभाल जयहिंद कंपनीच्या भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार सीपीआय संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसूर यांच्यासह हवालदार चिकोडी, बसवराज न्हावी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आयशर वाहनात अडकून पडलेल्या गंभीर जखमी ब्रह्मा याला तातडीने प्राथमिक उपचारासाठी येथील सरकारी महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले तर मयत अनिल याचा मृतदेह मोठ्या शिताफीने बाहेर काढला. याबाबत रुपेश शिवाजी नाईक (रा. ईदलहोंड) यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक गुर्लहोसूर यांनी चालवला आहे. मयत क्लिनर अनिल यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.