सौंदलगा : शतकोत्तर परंपरा असणारी कुंभार गल्लीतील दत्त मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
सौंदलगा येथील कुंभार गल्लीतील दत्त मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी १०० वर्षांपूर्वी पासून साजरी केली जाते. याची शंभर वर्षांपूर्वी सुरुवात दत्त मंदिराचे पुजारी कै. रामचंद्र कुंभार, कै. दामाजी कुंभार या दोन भावांनी साजरी करण्यास सुरुवात केली. आज त्यांची तिसरी पिढी सर्वांच्या सहकार्याने मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरी करीत आहेत. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर एक आठवडा मंदिरामध्ये वात घालून सुरुवात करण्यात आली. यानंतर सात दिवस अवधूत अवचित भजनी मंडळाचा दररोज भजनाचा कार्यक्रम होत होता. यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित रहात होते. या वर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी मंदिराचा गाभारा व परिसर फुलांनी सजवला होता. त्यामुळे गेले दोन दिवस भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. भाविकांनी जन्माष्टमीच्या अगोदर दोन दिवस व जन्माष्टमी दिवशी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. (ता.१८) सकाळी श्रींच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर दुपारी तीन वाजता सौ.व श्री. सुधाकर कुंभार यांनी श्री सत्यनारायणाची पूजा केली. त्यावेळी तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. यानंतर सायंकाळी सात नंतर भजनाला सुरुवात झाली. यावेळी मंदिरामध्ये पाळणा फुलांनी सजवलेला होता. त्याचबरोबर मंदिरासमोर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. यावेळी महिला व भाविक, अबाल- वृद्धासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मकाळ साजरा करण्यात आला. यावेळी भक्तांनी पाळण्यावरती पुष्पवृष्टी केली.
महिलांनी पाळणा गीत गायले. यानंतर सुंटवडा वाटप करण्यात आला. (ता.१९) संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम होऊन रात्री आठ वाजता दत्त मंदिर पासून टाळ, मृदंगाच्या गजरात ज्ञानोबा, तुकाराम, रामकृष्ण चा गजर करत व अभंग म्हणत भक्तीमय वातावरणात श्रीकृष्णाची प्रतीकृती डोक्यावर घेऊन कुंभार गल्ली, धनगर गल्ली, दुर्गा माता मंदिर जवळून रेणुका मंदिर शेजारी असणाऱ्या महादेव मंदिरावरती गोपाळकाला साजरा करण्यात आला. त्यानंतर रात्री महाप्रसादाचे वाटप करून श्रीकृष्ण जन्माष्टमी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक दिंडे, दिनकर पाटील, नंदकुमार माळी, शिवाजी चौगुले, रघुनाथ मोरे, शेखर पाटील, रवी निडसोसे, विष्णू साजरे, एकनाथ कुंभार, दत्तात्रय कुंभार, शिवाजी सूर्यवंशी, बाळासाहेब कुंभार, गोरोबा कुंभार, सिद्धू कुंभार, साताप्पा कुंभार, प्रकाश कुंभार, सागर चौगुले, के.व्ही. कुंभार यासह महिलावर्ग, भाविक यांनी सहभाग घेतला होता.
Belgaum Varta Belgaum Varta