पठाडे दाम्पत्यांनी केली जनजागृती : कचरा घंटागाडीला देण्याचे आवाहन
निपाणी (वार्ता) : शहर आणि उपनगरातील कचरा उठाव करण्यासाठी नगरपालिकेतर्फे घंटागाड्या उपलब्ध केल्या आहेत. तरीही काही वेळा घंटा गाड्या कचरा उचलण्यासाठी येत नसल्याने अथवा उशिरा आल्याने वार्ड क्रमांक 13 मधील नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत होते. परिणामी दुर्गंधीचा सामना नागरिकांनाच करावा लागत होता ही बाब लक्षात घेऊन नगरसेविका अनिता पठाडे व माजी नगरसेवक रोटरी क्लबचे अध्यक्ष दिलीप पठाडे यांनी नागरिकांना घंटागाडीला कचरा देण्याबाबत मार्गदर्शन केले.
नागरिकांनी स्वच्छता आणि आरोग्यासंबंधी जागरूक रहावे. सार्वजनिक ठिकाणी कचरा करू नये. कचर्याची योग्य ती विल्हेवाट लावावी अशी जनजागृती वार्ड क्र. 13 च्या नगरसेविका अनिता दिलीप पठाडे यांनी केली. वार्ड क्र. 13 उपनगरीय वसाहत रामनगर रस्त्याकडेला 24 तास पाणी योजनेच्या पाईप लाईनसाठी व्हॉल्व बसविण्यात आला आहे. नेमके त्याच ठिकाणी येथील रहिवाशी, नागरिक व येथून ये-जा करणार्या नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात होता. त्यामुळे येथील परिसरात प्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे येथील पाणी पुरवठा करणार्या कर्मचार्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत होता. त्याची दखल घेत नगरसेविका अनिता पठाडे, रोटरी क्लब अध्यक्ष दिलीप पठाडे यांनी या ठिकाणी भेट देवून येथे कचरा न टाकण्यासाठी आवाहन केले. यावेळी नागरिकांनी घंटागाडी वेळेवर येत नसल्याने नाईलाजाने कचरा टाकला जात असल्याचे सांगितले. त्यानुसार पठाडे यांनी नगरपालिका कर्मचार्यांना याठिकाणी बोलावून दररोज कचरा घंटागाडी पाठविण्याच्या सूचना केल्या.
यावेळी विजय वरूटे, नंदकुमार वासुदेव, शितल नागराळे, संजीव सक्कण्णावर, संजय सुर्यवंशी यांच्यासह नागरिक, महिलांची उपस्थिती होती.
Belgaum Varta Belgaum Varta