निपाणी परिसरात स्वागत : महिलांनी साधला दुपारचा मुहूर्त
निपाणी (वार्ता) : विघ्नहर्त्या गणरायाची स्थापना झाल्यानंतर गौरीची स्थापना केली जाते. त्यामुळे दोन दिवसांपासून स्वागताची तयारी केली होती. शनिवारी (ता. ३) दिवसभर गौरीच्या आवाहनासाठी नदी, तलाव, जलकुंभ आणि विहिरीवर महिलांची लगबग दिसून आली. सणाच्या पार्श्वभूमीवर निपाणी बाजारपेठेत विविध प्रकारचे गौरीचे मुखवटे उपलब्ध केले होते. त्याच्या खरेदीसाठी शुक्रवारी (ता.२) गर्दी झाली होती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह अनेक घरांत मुखवट्याच्या गौरी पुजल्या. या मुखवट्यावर सजावटीसाठी लागणाऱ्या चाफा, मक्याच्या कणसाचे तुरे, गौरीचे डहाळे खरेदीसाठी बुधवारी महिलांनी गर्दी केली होती. सकाळी रंगरंगोटी करून देवीचे रुप असलेल्या मुखवट्यांची प्रतिष्ठापना केली.
या सणाच्या नवविवाहितेने सासरी गौराई घेऊन देण्याची पद्धत आहे. गौरीच्या साड्या, दागिने, मांडव, वस्त्रमाळा, धूप, सुपारी अशा वस्तू अर्पण केल्या. अनेक कुटुंबांमध्ये तांबे, पितळेचे मुखवटे घालून गौरी सजविल्या होत्या.गौरीला नैवेद्यासाठी महिलांनी करंजी, लाडू, शंकरपाळी, चकली, भाकरवडी, जिलेबी, मिठाई, चिवडा, बालुशाही, गुलाबजामून असा विविध प्रकारचा फराळही केला आहे. याशिवाय बाजारातून केळी, सफरचंद, चिक्कू, पेरू, डाळिंब, मोसंबी, काकडीही आणली होती. रविवारी (ता.४) पुरणपोळीचा नैवेद्य गौराईला दाखविला जाणार आहे.
—
दुपारचा साधला मुहूर्त
शनिवारी गौरीचे सोनपावलांनी आगमन झाले. दिवसभरात दुपारी साडेबारा ते दीड आणि साडेतीन ते सायंकाळी पाचपर्यंत असे मुहूर्त गौरीच्या प्रतिष्ठापनेसाठी होते. अनेक महिलांनी दुपारी साडेबारा ते दीड हा मुहूर्त साधला. तर काही नोकरदार महिलांनी सकाळी साडेआठ वाजता गौरीची पूजा केली.
Belgaum Varta Belgaum Varta