विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : मास्क, सॅनिटायझर बंधनकारक
निपाणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. त्यामुळे निपाणी शहर आणि ग्रामीण भागात सोमवारपासून (ता.5) शाळांचे अध्यापन प्रत्यक्ष पूर्णवेळ सुरू झाले आहे. रुग्ण कमी झाले असले तरी अशा स्थितीत मुले पूर्णवेळ शाळेत जाणार म्हणून प्रत्येक पालकाची चिंता वाढली आहे. प्रत्यक्ष वर्ग सुरू करताना तहसीलदार, गट शिक्षणाधिकारी यांच्या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत विविध विषयांवर चर्चा होऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवाय विद्यार्थी शाळेला येत असल्याबाबत पालकांचे संमतीपत्रही बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेत निपाणी तालुक्यात रुग्णसंख्या प्रचंड वाढली. मात्र सर्वत्र सुरू असलेले लसीकरण, आरोग्य यंत्रणेकडून राबविण्यात येणार्या प्रभावी उपाययोजनेमुळे रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे.
विद्यार्थीही घरी राहून कंटाळले असून ऑनलाईन शिक्षणातील समस्यांमुळे मुलेही पूर्णवेळ शाळेत जाण्यासाठी उत्सुक झाली होती. सध्या सुरू करण्यात आलेल्या पूर्ण वेळ शाळेसाठी प्राथमिक माध्यमिक बारावी शाळा महाविद्यालयमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती 80 टक्के दिसून आली. पूर्णवेळ शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसापासून शाळा आणि महाविद्यालयातील स्वच्छता सॅनिटायझर फवारणी निरंतरपणे करण्यात आली.
घरी येताच कपडे बदला, आंघोळही करा!
सोमवारपासून पूर्णवेळ सलग वर्ग भरविण्यात येत आहेत. शाळेतून सुटल्यानंतर मुलांना घरी आल्यानंतर थेट आंघोळ करावी. खबरदारी म्हणून गणवेश दररोज धुऊन घालावा, अशा सूचना शाळेत दिल्या जात आहेत. याशिवाय शाळेत येताच मुलांची ऑक्सिजन मात्रा, तापमान तपासले जात आहे. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविला जात आहे. मास्क लावणे तर सक्तीचा असून पालक मुलांना जादा मास्क दप्तरातून देण्याच्या सूचना केल्या जात आहेत. वर्ग सुटल्यानंतर मुले थेट घरी जात आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर राखले जात आहे. शिक्षकही येता -जाता मुलांवर लक्ष ठेवून आहेत.
—–
’कोरोना महामारीत ऑनलाईन अध्यापन स्तुत्य उपक्रम होता. मात्र शाळेतील अध्यापन व ऑनलाईन अध्यापनात कमालीचा फरक आहे. प्रत्यक्ष विद्यार्थी समोर असणे व वेळेची मर्यादा या दोन्ही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत. कोरोनामुळे अजूनही आरोग्य सुरक्षेबाबत काळजी वाटते. परंतु आता पूर्णवेळ शाळा सुरू झाल्याने जाणे क्रमप्राप्त आहे.’
-श्रेया जाधव, विद्यार्थिनी, निपाणी
Check Also
मानसिक आरोग्याबाबत सतर्क राहणे आवश्यक
Spread the love रुपाली निलाखे; कुर्ली हायस्कूलमध्ये व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शन निपाणी (वार्ता) : शैक्षणिक प्रवाहात …