बाजारपेठेतही उत्साह कमी : मूर्तिकारही अडचणीत
निपाणी : नवरात्रोत्सव अवघ्या 1 दिवसांवर आला आहे. मात्र यंदाही कोरोनाच्या सावटात नवरात्रोत्सवाची तयारी दिसत आहे. दरम्यान गुरुवारी (ता. 7) घटस्थापना होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर घरोघरी त्याची तयारी सुरू झाली आहे.
कोरोना प्रादुर्भाव कमी असला तरी खबरदारी म्हणून नवरात्रोत्सवही साधेपणानेच साजरा करावा लागणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियमावली बनवली असून त्यानुसारच यंदाच्या नवरात्र उत्सव साजरा होणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी दुर्गामाता मूर्ती प्रतिष्ठापना करण्यास प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. तरीही अनेक मंडळांनी तयारी चालवली आहे. याशिवाय गर्दी होणार्या मंदिरातीलही मूर्ती प्रतिष्ठापना साधेपणाने करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या ठिकाणी केवळ मानकर्यांच्या व पूजा यांच्या उपस्थितीतच पूजा होणार आहे. लॉकडाउनसह सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शहर आणि ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था डळमळलेली आहे. परिणामी बाजारपेठेत सध्या तरी ग्राहक नाहीत. त्यामुळे अनेक व्यापारी, व्यावसायिकांनी मर्यादित स्वरूपात मालाची खरेदी केलेली आहे.
सध्या बाजारपेठेतही फारसा उत्साह राहिलेला नाही. पुढील काळात सोयाबीन, उसाचे पैसे हाती पडल्यानंतर चित्र सुधारेल अशी अपेक्षा व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे. सध्या मूर्तिकार देवीच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात व्यस्त आहेत. उत्सवात सर्वच व्यवसायांना बहर येतो.
नवरात्रोत्सवात देवीची मूर्ती बनविणार्या मूर्तिकारांची कामे युद्धपातळीवर सुरु असतात. मात्र यंदा मंडळांची संख्या मोजकीच असण्याची शक्यता आहे. शिवाय मोठया मूर्तीही नसतील. त्यामुळे मूर्तिकारांनी कमी संख्येत लहान मूर्ती बनविल्या आहेत. पूजेसाठी छोटया मूर्तीना प्राधान्य देण्यात आले आहे. सध्या मूर्तीची रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. आधीच कोरोनामुळे गणेशोत्सवही साधेपणाने साजरा झाला. आता नवरात्रोत्सवातही मोठी उलाढाल नसल्याने मूर्तिकारही अडचणीत सापडले आहेत.
