कालकुंद्री येथील शिक्षक श्रीकांत पाटील यांचा अनोखा उपक्रम
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कालकुंद्री ता. चंदगड गावचे सुपुत्र उपक्रमशील शिक्षकप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षक तीन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारांचे मानकरी श्रीकांत वैजनाथ पाटील यांनी गावातील ज्ञानदीप सार्वजनिक वाचनालयास आपल्या 56 व्या वाढदिवसानिमित्त 56 वाचनीय व उपयुक्त पुस्तके भेट दिली.
केंद्र शाळा कोवाड येथे मुख्याध्यापक, पत्रकार तसेच चंदगड तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष असलेल्या पाटील यांनी जेवणावळी, बॅनरबाजी अशा खर्चाला फाटा देत गावातील वाचन चळवळ वाढावी या उदात्त व परिवर्तनवादी विचारातून वाचनालयाला आपल्या वाढदिवसाच्या संख्येएवढी पुस्तके भेट दिली. वाचनालयाचे संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. व्ही. आर. पाटील यांच्या हस्ते श्रीकांत पाटील यांचा शाल, श्रीफळ, फेटा देऊन यथोचित सन्मान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी श्रीकांत पाटील यांनी पुस्तकांचे जीवनातील महत्व सांगताना आपण वेळोवेळी खरेदी केलेल्या पुस्तकांमुळे स्वत:चे वाचनालय बनले आहे. यातीलच काही निवडक पुस्तके अधिकाधिक लोकांनी वाचावीत या हेतूने भेट दिली आहेत. वाचकांनी आपल्या ज्ञानकक्षा उंचावून सुखी आनंदी जीवनासाठी याचा उपयोग करावा असे आवाहन केले.
या अनोख्या, प्रेरणादायी व अनुकरणीय उपक्रमाबद्दल श्रीकांत पाटील यांचे उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून कौतुक केले. यावेळी शिवसेना माजी विभाग प्रमुख नारायण जोशी, ग्राम पं. सदस्य विलास शेटजी, कवी हनमंत पाटील, विनायक पाटील, लोकळू पाटील, के. आर. पाटील, कल्लाप्पा कांबळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रस्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष के. जे. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. युवराज पाटील केले. आभार पी. एस. कडोलकर यांनी मानले.
