
दुष्परिणामांबाबत लोकांच्यात जनजागृती करा
कोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासन विभाग (FDA) विभागाची महत्त्वाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने ‘अजिनोमोटो’ (मोनोसोडियम ग्लुटामेट) या पदार्थाच्या वाढत्या वापरामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून याचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, त्याचे आरोग्यास घातक असलेले स्वरूप सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तसेच, या पदार्थाच्या विक्रीवर आणि वापरावर कायदेशीररित्या बंदी आणण्यासाठी कोणत्या तांत्रिक व प्रशासकीय तरतुदी करता येतील, याचा सखोल आढावा घेण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले.
या बैठकीस खासदार शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, आहार तज्ज्ञ तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त उदय लोहकरे व इतर परिमंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
अलीकडील काळात सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही या पदार्थाचा वाढता वापर यावेळी अधोरेखित करण्यात आला. या बैठकीत उपस्थित असलेल्या आहार तज्ज्ञांनी अजिनोमोटोच्या नियमित सेवनामुळे उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांबाबत तांत्रिक प्रतिपादन केले. हा पदार्थ चवीसाठी आकर्षक वाटत असला, तरी तो मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला. विशेषतः लहान मुले आणि गर्भवती महिलांच्या आरोग्यासाठी हा घटक अत्यंत अपायकारक असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले. उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि मज्जासंस्थेशी संबंधित विकारांमध्ये यामुळे वाढ होत असल्याचे निष्कर्ष आरोग्य विभागातर्फे मांडण्यात आले. या धोक्याची गांभीर्याने दखल घेत, अन्न व औषध प्रशासनाने प्रत्येक खाद्यपदार्थाच्या पाकिटावर किंवा हॉटेलमधील फलकांवर याच्या वापराबाबत स्पष्ट माहिती देण्याबाबत कठोर भूमिका घ्यावी, अशी आग्रही मागणी बैठकीत करण्यात आली.
अन्न व औषध प्रशासन विभागाने यापुढे संयुक्तपणे मोहीम राबवून बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या अन्नपदार्थांची तपासणी करावी, असे या बैठकीत ठरविण्यात आले. अन्न सुरक्षा मानकांनुसार अजिनोमोटोची भेसळ किंवा अतिरिक्त वापर होतोय का, यावर लक्ष केंद्रित करावे असे सांगण्यात आले. नागरिकांनी देखील बाहेरचे अन्नपदार्थ घेताना आरोग्याची काळजी घ्यावी आणि अशा अपायकारक घटकांबाबत जागरूक राहावे, असे आवाहन यावेळी प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. जिल्ह्यात खाद्यपदार्थांमधील भेसळ व प्रमाण तपासणीसाठी आवश्यक एनएबीएल प्रयोगशाळा कोल्हापूर शहरात सुरु करण्याचेही यावेळी मंत्री महोदयांनी आश्वासन दिले. शासकीय गतिमानता अभियानांतर्गत तालुकास्तरावरही अन्न व औषध प्रशासन विभागाने जाऊन तपासण्या करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta