
बागलकोटमध्ये उमेश मेटी, दावणगेरे दक्षिणेत समर्थ मल्लिकार्जुन विजयी
बंगळूर : राज्यातील अत्यंत लक्षवेधी ठरलेल्या दोन विधानसभा पोटनिवडणुकांत सत्ताधारी काँग्रेसने विजय मिळवून आपल्या दोन्ही जागा राखून ठेवण्यात यश मिळविले आहे. बागलकोट मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार उमेश मेटी यांनी दणदणीत विजय मिळवला असून दावणगेरे दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे समर्थ मल्लिकार्जून यांनी भाजपशी जोरदार संघर्ष करत अखेर विजय संपादन केला.
बागलकोट विधानसभा पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. येथे काँग्रेसचे उमेदवार उमेश मेटी यांनी भाजपचे विरण्णा चरंतीमठ यांचा पराभव करत विजय मिळवला. या विजयासह ते दिवंगत एच. वाय. मेटी यांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे आले आहेत. या निवडणुकीत उमेश मेटी यांनी २१,८६६ मतांच्या फरकाने विजय मिळवला.
मतमोजणीच्या आकडेवारीनुसार, उमेश मेटी यांना ९७,९४१ मते मिळाली, तर वीरण्णा चरंतीमठ यांना ७६,०७५ मते मिळाली.
दिवंगत एच. वाय. मेटी यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली होती. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट काँग्रेसच्या बाजूने गेली. तसेच मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी या मतदारसंघात व्यापक प्रचार केला होता. त्यांच्या प्रभावामुळेही काँग्रेसच्या विजयास हातभार लागल्याचे मानले जात आहे.
दावणगेरे दक्षिणमध्ये चुरशीची लढत
दावणगेरे दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे २७ वर्षीय उमेदवार समर्थ शामनूर यांनी चुरशीच्या लढतीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, शामनूर कुटुंबातही आनंदाची लहर आहे. आजोबांच्या राजकीय वारशाचा वारसा नातवाने पुढे चालविल्याने या विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
या मतदारसंघातील काँग्रेसच्या यशामागे अनेक राजकीय व सामाजिक घटक निर्णायक ठरल्याचे विश्लेषणात दिसून येते. विशेषतः शामनूर कुटुंबाबद्दलची सहानुभूती मतदारांमध्ये स्पष्टपणे जाणवली आणि ती काँग्रेसच्या बाजूने गेली.
ग्रामीण भागात लिंगायत समाजाच्या मतांचा कल काँग्रेसकडे वळला, हेही एक महत्त्वाचे कारण ठरले. त्याचप्रमाणे कुरुब समाजातील मतांमध्ये कोणतीही फूट पडली नाही आणि ती मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला मिळाली.
मुस्लिम समाजातील पारंपरिक मतदारांनीही मोठ्या प्रमाणात काँग्रेसला पाठिंबा दिला. विशेषतः युवा मतदार वगळता सुमारे ७० टक्के मते काँग्रेसकडे गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
याशिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेली प्रचारयोजना आणि रणनीती प्रभावी ठरली. तसेच प्रबळ मुस्लिम उमेदवार सादिक फायलवान यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने काँग्रेस उमेदवाराला लाभ झाला.
मतमोजणीचा निकाल
२१व्या फेरीअखेर काँग्रेसचे समर्थ शामनूर यांनी ६८,६१९ मते मिळवत ४,८७३ मतांच्या फरकाने विजय मिळवला. भाजपचे श्रीनिवास दास करियप्पा यांना ६३,७४६ मते मिळाली, तर एसडीपीआयचे अप्सर कोडलीपेटे यांनी १८,४८५ मते मिळवली.
दावणगेरे दक्षिण पोटनिवडणुकीचा निकाल काँग्रेससाठी मोठा राजकीय बळ देणारा ठरला आहे, तर भाजपसमोर आत्मपरीक्षणाचे आव्हान उभे केले आहे. विविध सामाजिक समीकरणे आणि प्रभावी राजकीय रणनीती या निकालामागे निर्णायक ठरल्या असून, आगामी निवडणुकांसाठी हा निकाल दिशादर्शक मानला जात आहे.
उमेदवारांना मिळालेली मते
बागलकोट
उमेश मेटी (कॉंग्रेस) -९७,९४१ मते (विजयी)
वीरण्णा चरंतीमठ – ७६,०७५ मते
दावणगेरे दक्षिण
समर्थ शामनूर (कॉंग्रेस) – ६८,६१९ मते (विजयी)
श्रीनिवास दास करियप्पा (भाजप) – ६३,७४६ मते
अप्सर कोडलीपेटे (एसडीपीआय) – १८,४८५ मते
Belgaum Varta Belgaum Varta