Wednesday , August 19 2026
Breaking News

काटगाळीत अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला; महिला व बालविकास विभागाची तात्काळ कारवाई

Spread the love

 

खानापूर : खानापूर तालुक्यातील काटगाळी गावात अल्पवयीन मुलीचा विवाह लावण्याची तयारी सुरू असताना महिला व बालविकास विभागाने वेळेवर हस्तक्षेप करत बालविवाह रोखण्यात यश मिळवले. स्पंदना स्वयं-सहाय्यता समूहाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

माहिती मिळताच महिला व बालविकास विभागाचे सीडीपीओ विक्रम यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शुक्रवारी विवाहाची तयारी सुरू असतानाच अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून संबंधित कुटुंबीयांशी चर्चा केली आणि विवाह थांबविण्यात आला.

यावेळी अधिकाऱ्यांनी मुलीच्या पालकांना बालविवाहाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक दुष्परिणाम समजावून सांगत बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती दिली. समुपदेशनानंतर पालकांनी सहमती दर्शवत विवाह स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

सीडीपीओ विक्रम यांनी सांगितले की, “बालविवाहामुळे मुलांचे आरोग्य, शिक्षण आणि भवितव्य धोक्यात येते. अशा प्रथांना आळा घालण्यासाठी समाजानेही पुढाकार घेणे आवश्यक आहे.”

दरम्यान, बालविवाहाची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ महिला व बालविकास विभाग, पोलिस किंवा संबंधित यंत्रणांना कळवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे काटगाळी येथील एका अल्पवयीन मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यात प्रशासनाला यश आले.

About Belgaum Varta

Check Also

कचऱ्याच्या वादातून थरार; खानापूर तालुक्यातील हेब्बाळच्या दाम्पत्यावर सांगलीत हल्ला, पत्नीचा मृत्यू

Spread the love  खानापूर : कचरा टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट जीवघेण्या हल्ल्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *