Tuesday , August 18 2026
Breaking News

स्मार्ट सिटीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुराडा; खड्डेमय रस्ते, बंद गाळे अन् निकृष्ट कामांचा पाढा : रमाकांत कोंडुसकरांचा लोकप्रतिनिधींवर घणाघाती हल्ला

Spread the love

 

बेळगाव : विकासाच्या नावाखाली बेळगावकरांची दिशाभूल आणि फसवणूक सुरू आहे. कोट्यवधींचा निधी खर्चूनही शहराची अवस्था सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस विद्रूप होत चालली आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराचा स्मार्टपणा कमी आणि विद्रूपपणा अधिक वाढला आहे. जनतेच्या पैशातून होणाऱ्या कामांचे श्रेय घेणाऱ्या लोकप्रतिनिधींनी प्रथम जनतेला दर्जेदार सुविधा देण्याची जबाबदारी पार पाडावी, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते तथा श्रीराम सेना हिंदुस्तानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत दादा कोंडुसकर यांनी केला.

शहरातील विविध विकासकामे, रस्त्यांची दुरवस्था आणि कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“बेळगावला जणू वालीच नाही!”

शहरातील एकही रस्ता खड्डेमुक्त राहिलेला नाही. रस्त्यांवर जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. शहराची अवस्था पाहता बेळगावला जणू काही वालीच राहिलेला नाही, अशी संतप्त टीका कोंडुसकर यांनी केली.

निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी घाईघाईने करण्यात आलेल्या रस्त्यांची काही महिन्यांतच चाळण झाली. शहापूर, मिरापूर गल्ली, सराफ गल्ली, महात्मा फुले रोड, विठ्ठल देव गल्ली, हट्टी होळी गल्ली, भाजी मंडई आणि गोवा वेस्ट परिसरातील रस्त्यांची अवस्था विकासकामांच्या दर्जाची पोलखोल करणारी आहे. या निकृष्ट कामांना जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

स्मार्ट सिटीचा पैसा गेला कुठे?

स्मार्ट सिटीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र एवढा पैसा खर्च होऊनही शहराला स्मार्ट रूप मिळाले का, हा खरा प्रश्न आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराचा विकास करण्याऐवजी रस्ते, वाहतूक व्यवस्था आणि मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहे का, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी कोंडुसकर यांनी केली.

रस्ते खोदण्याचे कंत्राट आहे; बुजवण्याची जबाबदारी कुणाची?

पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी जलवाहिन्या टाकण्याच्या नावाखाली शहरातील रस्ते वारंवार खोदले जात आहेत. रस्ते खोदण्याचे कंत्राट दिले जाते; मग खोदलेले रस्ते पूर्ववत करण्याची जबाबदारी कोणाची? असा थेट सवाल त्यांनी प्रशासनाला केला.

खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. कर भरणाऱ्या जनतेला सुरक्षित आणि चांगले रस्ते मिळण्याचा अधिकार नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

भ्रष्टाचाराची कीड शहराला पोखरतेय!

बेळगाव शहरात भ्रष्टाचाराची कीड पसरली असून, प्रत्येक कामात राजकीय हस्तक्षेप वाढत आहे. घर बांधण्यासाठी महापालिकेची परवानगी आवश्यक असते; मात्र राजकीय दबावामुळे अधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे काम करता येत नसल्याने प्रशासनाची यंत्रणा कोलमडली आहे, असा आरोप कोंडुसकर यांनी केला.

“भ्रष्टाचाराची ही कीड वेळीच थांबवली नाही तर ती संपूर्ण शहरव्यवस्थेला पोखरून काढेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

खासबाग मार्केट : झाडांची कत्तल, गाळे बंद!

खासबाग येथे भाजी मार्केट उभारण्यासाठी झाडांची कत्तल करण्यात आली. कोट्यवधींचा खर्च करून उभारलेल्या या मार्केटमधील अनेक गाळे आजही बंद आहेत. त्यामुळे जनतेच्या पैशातून उभारलेला प्रकल्प उपयोगाचा की केवळ दिखाव्याचा, असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे भाजी विक्रेत्या महिलांसाठी आवश्यक असलेल्या शौचालयाचीही योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही. विकासकामांची आखणी करताना सामान्य नागरिकांच्या गरजा विचारात घेतल्या जात नसल्याचे हे उदाहरण असल्याचे कोंडुसकर यांनी म्हटले.

साई मंदिरातील गाळेही धूळ खात!

साई मंदिर परिसरात उभारण्यात आलेले व्यापारी गाळेही कित्येक वर्षांपासून बंद आहेत. जनतेच्या पैशातून बांधलेल्या या गाळ्यांचा वापरच होणार नसेल तर त्यासाठी खर्च करण्यात आलेला निधी कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सहा महिन्यांत ओव्हरब्रिजची दुरवस्था!

उद्यमबाग येथील ओव्हरब्रिजच्या कामाच्या दर्जावरही कोंडुसकर यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. अवघ्या सहा महिन्यांत ब्रिजच्या रस्त्याची दुरवस्था झाली असेल तर कामाचा दर्जा तपासणार कोण आणि जबाबदार कंत्राटदारावर कारवाई करणार कोण? असा सवाल त्यांनी केला.

न्यू गुड्स शेड रोडचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे तात्पुरता मार्गी लागला. मात्र त्याचे श्रेय घेण्यासाठी नगरसेवकांकडून सुरू असलेली धडपड जनतेच्या नजरेतून सुटलेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

“जनतेच्या पैशातून विकास; मग श्रेय कशाचे?”

आमदार, खासदार अथवा नगरसेवक स्वतःच्या खिशातून विकासकामे करीत नाहीत. जनतेने भरलेल्या करातूनच शासनाकडून निधी उपलब्ध होतो. त्यामुळे जनतेच्या पैशातून झालेल्या कामांचे श्रेय स्वतःच्या नावावर घेण्याचा प्रकार थांबला पाहिजे. बेळगावकर भोळे नाहीत; कोण काय करतो आणि कोण केवळ श्रेय लाटतो, हे जनतेला चांगलेच कळते, असा टोला कोंडुसकर यांनी लगावला.

“विकासाच्या नावाखाली बेळगावकरांची फसवणूक यापुढे खपवून घेतली जाणार नाही. जनतेच्या पैशाचा हिशेब जनतेला द्यावाच लागेल. अन्यथा येणाऱ्या काळात जनता लोकप्रतिनिधींना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा रमाकांत दादा कोंडुसकर यांनी दिला.

About Belgaum Varta

Check Also

पार्वतीनगर, शाहूनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीती

Spread the love  बेळगाव : कंग्राळी खुर्द येथील पार्वतीनगर व शाहूनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *