

बेळगाव : अनगोळ येथील शिवशक्तीनगर परिसरात झालेल्या घरफोडीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात टिळकवाडी पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे २ लाख ४९ हजार २६० रुपये किमतीचे १७.८३ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनगोळ, शिवशक्तीनगर येथे चोरी झाल्याप्रकरणी गुन्हा क्रमांक ८१/२०२६, कलम ३०५ बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे तुषार मारुती करेण्णावर (वय २२, रा. इंदिरानगर, अनगोळ, सध्या हिंदूनगर, तिसरे रेल्वे गेट, पराठा कॉर्नर) आणि यल्लप्पा गजानन मुगळे (वय २८, रा. रघुनाथ पेठ, अनगोळ) अशी आहेत.
आरोपींकडून ५.३६ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (किंमत ७५,०४० रुपये), २.९० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (४०,६०० रुपये), ३.१४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी (४३,६०० रुपये) तसेच ६.४३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले (९०,०२० रुपये) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली, खडेबाजारचे एसीपी तसेच टिळकवाडी पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta