बेंगळूर : सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती सुनिश्चित करण्याबरोबरच प्रशासनातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने सुरू केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित ‘कर्तव्य’ हजेरी नोंदणी प्रणालीला सरकारी कर्मचाऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उपमुख्यमंत्री तथा प्रशासकीय सुधारणा विभागाचे प्रमुख डी. के. शिवकुमार यांनी ‘कर्तव्य’ ॲपची अंमलबजावणी वेगाने आणि प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन हजेरी नोंदणीत लक्षणीय वाढ झाली आहे. या प्रणालीद्वारे दररोज नोंदविण्यात येणारी उपस्थिती १.८५ लाखांवरून २.३२ लाखांपर्यंत पोहोचली असून, यात तब्बल २५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
सध्या राज्यातील ४२ विभागांतील ४ लाख ७८ हजार ५२२ कर्मचारी या डिजिटल हजेरी प्रणालीचा वापर करत आहेत. शालेय शिक्षण विभाग या उपक्रमात आघाडीवर असून, १ लाख ६८ हजार २५२ शिक्षकांनी ‘कर्तव्य’ ॲपवर नोंदणी केली आहे. याशिवाय आरोग्य व कुटुंब कल्याण, आयुष, पदवीपूर्व शिक्षण, मागासवर्ग कल्याण आदी विभागांनी ९० टक्क्यांहून अधिक नोंदणीचे उद्दिष्ट गाठले आहे.
जनतेला अधिक जलद, कार्यक्षम आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ‘कर्तव्य’ ॲपच्या माध्यमातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष उपलब्धता सुनिश्चित होत असल्याने नागरिकांना शासकीय सेवा वेळेत मिळण्यास मदत होणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रशासनातील उत्तरदायित्व वाढून नागरी सेवांच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta