Friday , June 19 2026
Breaking News

लिव्ह-इनमधील प्रेयसीची शिक्षकाकडून निर्घृण हत्या; मृतदेह तिलारी घाटातील जंगलात फेकल्याचा आरोप

Spread the love

 

बेळगाव : दहा वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीची तिच्याच साथीदाराने दुसऱ्या विवाहाला विरोध केल्याच्या कारणावरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खाजगी शिक्षक असलेल्या आरोपीने वडील आणि मामाच्या मदतीने कट रचून तरुणीचा खून केल्याचा आरोप असून, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह महाराष्ट्रातील तिलारी घाटातील जंगलात फेकून दिल्याचे तपासात समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगाव तालुक्यातील वंटमुरी येथील गंगव्वा हंचिनमणी (२५) आणि हुक्केरी तालुक्यातील राजनकट्टी येथील बसवराज करनावर (३३) हे गेल्या दहा वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. दरम्यान, बसवराजने दुसऱ्या तरुणीशी विवाह करण्याची तयारी सुरू केली होती. याला गंगव्वाने विरोध करून जाब विचारल्यानंतर आरोपीने तिचा कायमचा काटा काढण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
तपासानुसार, “विशालगडला फिरायला जाऊ” असे आमिष दाखवून बसवराज गंगव्वाला कारमधून घेऊन गेला. त्यानंतर वडील आणि मामाच्या मदतीने लोखंडी रॉडने तिच्यावर हल्ला करून हत्या करण्यात आली. गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपींनी मृतदेह तिलारी घाटातील जंगलात टाकल्याचे सांगितले जात आहे.
२९ मे रोजी तिलारी घाट परिसरात कुजलेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर चंदगड पोलिसांनी तपास सुरू केला. घटनास्थळाजवळील रस्ते आणि टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत पोलिसांनी संशयास्पद कारचा माग काढला. त्यानंतर बसवराज करनावरसह तिन्ही संशयितांना अटक करण्यात आली.
या घटनेमुळे मृत तरुणीच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. गंगव्वाच्या आईने आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत, “मुलगी प्रत्येक वेळी सर्व काही सुरळीत असल्याचे सांगायची. तिच्यासोबत असे भयंकर घडेल, याची कल्पनाही नव्हती,” अशी भावना व्यक्त केली.
मृत तरुणीचा भाऊ रमेश यानेही संताप व्यक्त करत, “महाराष्ट्र पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतरच बहिणीच्या हत्येची घटना समजली. या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी केली.

About Belgaum Varta

Check Also

कुत्र्याचा जीव वाचवताना आईचा दुर्दैवी अंत; मुलासमोरच घडली हृदयद्रावक घटना

Spread the love  बेळगाव : रस्ता ओलांडणाऱ्या एका भटक्या कुत्र्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात एका आईला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *