बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वाढते ओझे कमी व्हावे, शिक्षण अधिक आनंददायी व अनुभवाधारित व्हावे तसेच विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पकता आणि सामाजिक जाणीवा विकसित व्हाव्यात या उद्देशाने शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने यंदाही ‘नो बॅग डे’ उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांमध्ये दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी विद्यार्थ्यांना दप्तराशिवाय शिक्षणाचा अनुभव दिला जाणार आहे.
या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच्या चौकटीबाहेर नेऊन विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि कौशल्याधारित उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता, सामाजिक मूल्ये, नागरी जबाबदारी, संवाद कौशल्य आणि जीवनोपयोगी सवयी विकसित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण विभागाने (एससीईआरटी) प्रत्येक महिन्यासाठी स्वतंत्र विषय निश्चित केला असून त्या विषयावर आधारित संवाद, चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, समूहचर्चा, सृजनशील उपक्रम आणि अनुभवाधारित कृती शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहेत.
शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील माहिती आत्मसात करणे नव्हे, तर जीवनासाठी आवश्यक कौशल्ये, सामाजिक भान आणि जबाबदारीची जाणीव विकसित करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना उत्तम आणि जबाबदार नागरिक म्हणून घडविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
‘नो बॅग डे’साठी महिनानिहाय विषय
जून – विशेष कर्तृत्ववान व्यक्तींशी संवाद
जुलै – अमली पदार्थांच्या गैरवापरास प्रतिबंध
ऑगस्ट – माध्यमे आणि इंटरनेटचा सुयोग्य वापर
सप्टेंबर – पोषण, आरोग्य व स्वच्छता
ऑक्टोबर – सार्वजनिक स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन
नोव्हेंबर – आरोग्यदायी जीवनशैली
डिसेंबर – सार्वजनिक सुविधा आणि माझी जबाबदारी
जानेवारी – रस्ता सुरक्षा
फेब्रुवारी – गुन्हे, अपघात व आपत्तीप्रसंगी संरक्षण आणि सुरक्षितता
मार्च – लिंग समानतेला प्रोत्साहन
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि शिक्षणाला आनंददायी स्वरूप देणारा हा उपक्रम राज्यातील शाळांमध्ये नव्या उत्साहाने राबविण्यात येणार असून, ‘पुस्तकांपलीकडचे शिक्षण’ ही संकल्पना अधिक बळकट करण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे.
Belgaum Varta Belgaum Varta