


सहकार आणि विश्वासाच्या बळावर प्रगतीची यशस्वी वाटचाल
कोल्हापूर : बेळगांव मराठी मित्र मंडळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कोल्हापूर या संस्थेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता शिवाजी उद्यमनगर येथील शेठ रामभाई सामाणी स्मृती हॉलमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. गेल्या ३१ वर्षांच्या प्रवासात संस्थेने सभासदांचा विश्वास, आर्थिक शिस्त आणि सहकाराची मूल्ये जपून उल्लेखनीय प्रगती साधल्याचे या प्रसंगी अधोरेखित करण्यात आले.
सभेचा प्रारंभ मंगलचरणाने व गणेशवंदनाने झाला. सभेच्या सुरुवातीला पतसंस्थेचे अध्यक्ष मा. श्री. परशराम पाटील यांनी अहवाल वर्षात निधन झालेल्या संस्थेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक, वीर जवान तसेच विविध क्षेत्रांतील दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहिली.
सन २०२५-२०२६ या वर्षाचा संचालक मंडळाचा अहवाल, ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रके सौ. सुमन जाधव यांनी वाचून दाखवली, ज्यास सभेने सर्वानुमते मंजुरी दिली. मा. वाय. ए. पाटील यांनी मांडलेल्या नफा विभागणीच्या शिफारशीस मंजुरी देण्यात आली तसेच सभासदांना १२% लाभांश देण्याचे घोषित केले. सन २०२५-२६ मधील जादा खर्चास आणि २०२६-२७ च्या नवीन अंदाजपत्रकास श्री अमित नायकोजी यांनी मंजुरी घेतली. याशिवाय वैधानिक लेखापरीक्षण अहवाल, अंतर्गत हिशोब तपासणीसांची नियुक्ती, कर्जदार सभासदांना दिलेली सूट आणि सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार सुधारित उपविधी स्वीकारण्याबाबतचे महत्त्वाचे विषय मा. अशोक चौगुले आणि मा. यल्लाप्पा रेमाणीचे यांनी मांडले. आयत्या वेळच्या विषयात सभासदांनी केलेल्या सूचनांचा स्वीकार करून त्यांचे निराकरण करण्याचे संचालक मंडळाने त्यांना आश्वासित केले. हायर पर्चेस कर्जाच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास विनाविलंब कर्जवाटप करण्यात येईल असा विश्वासही सभासदांना सर्वानुमते देण्यात आला.
सभेचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. डॉ. सर्जेराव जाधव यांनी संतविचार आणि प्रेरणादायी काव्यपंक्तींचा उल्लेख करत केले. सभेच्या शेवटी तज्ज्ञ संचालक मा. श्री. अमित नायकोजी यांनी उपस्थित सर्व सभासद, संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाचे आभार मानले. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. शशिकांत ओऊळकर, जेष्ठ संचालक मा. अशोक चौगुले, मा. वाय.ए. पाटील, मा. महादेव कोलकर, मा. यल्लाप्पा रेमाणीचे, सौ. सुमती गोकाककर, सौ. सुनिता पाटील आदी मान्यवर व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. डी. आर. मोरे, प्रा. पी. एन. हरगुडे, डॉ. लक्ष्मण कातकर, सौ. गीता कातकर आणि डॉ. गोकाककर इ. माजी संचालकांची विशेष उपस्थिती उल्लेखनीय होती.

Belgaum Varta Belgaum Varta