Friday , October 23 2026
Breaking News

प्रज्वल रेवण्णा यांच्या हिंडलगा कारागृहातील स्थलांतराला तात्पुरती स्थगिती

Spread the love

 

सात कैद्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू; सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीने आदेशाचा फेरविचार

बेळगाव : माजी खासदार आणि बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या प्रज्वल रेवण्णा यांना बंगळूरमधील परप्पन अग्रहार मध्यवर्ती कारागृहातून बेळगावच्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात हलविण्याच्या आदेशाला राज्याच्या कारागृह व सुधारणा सेवा विभागाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र, अन्य सात कैद्यांच्या स्थलांतराला विभागाने मंजुरी दिल्याचे वृत्त आहे.

परप्पन अग्रहार कारागृहात बेकायदेशीररीत्या मोबाईलचा वापर झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर बंगळूर पोलिसांनी प्रज्वल रेवण्णा यांच्यासह सात आरोपींना वेगवेगळ्या कारागृहांत हलविण्याची शिफारस केली होती. त्यानुसार रेवण्णा यांना हिंडलगा कारागृहात हलविण्याचा आदेश देण्यात आला होता.

सुमारे दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी परप्पन अग्रहार कारागृहात छापा टाकला होता. त्यावेळी रेवण्णा यांच्या कोठडीत मोबाईल आणि पेनड्राइव्ह आढळल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात रेवण्णा यांच्यासह सात आरोपी आणि कारागृहातील वॉर्डन प्रकाश गावे यांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या नावाने बनावट जामीन आदेश तयार केल्याच्या प्रकरणात संबंधित कैद्यांचेही अन्य कारागृहांत स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणात कारागृहातील वरिष्ठ अधिकारी सोमशेखर यांनाही अटक झाली आहे.

रेवण्णा यांच्या स्थलांतरावर देखरेखीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याला अटक झाल्यानंतर सुरक्षेच्या आणि देखरेखीच्या दृष्टीने पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी स्थलांतराच्या आदेशाचा फेरविचार सुरू केला. त्यामुळे प्रज्वल रेवण्णा यांना हिंडलगा कारागृहात हलविण्याची प्रक्रिया सध्या तात्पुरती थांबली आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहज्योती योजनेतून १.३ लाख ग्राहक बाहेर; वैयक्तिक कागदपत्रे देण्यास नकार

Spread the love  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या महत्त्वाकांक्षी गृहज्योती योजनेला मोठा धक्का बसला असून, सुमारे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *