पोलिस प्रशासनाकडून व्यापार्यांना सूचना
निपाणी : शहर आणि उपनगरात वाढत चाललेल्या चोरीच्या व लुटमारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर निपाणी शहराकरिता आमदार फंडातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
असे असले तरी अडचणीच्या जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी व्यापारीवर्गाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी केले.
बसवेश्वर पोलिस चौक ठाण्यात आयोजित हॉटेल, सराफ, पेट्रोल पंप, किराणा व इतर व्यापारी वर्गाच्या बैठकीत ते बोलत होते.
शिवयोगी म्हणाले, अलीकडच्या काळात चोरीसह लुटमारीच्या घटनांत वाढ होत चालली आहे. त्यामुळे अशा घटनांचा तपास होणे अडचणीचे ठरत आहे. अनेक व्यापार्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे फावत आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे असणे काळाची गरज बनले आहे. व्यापारी वर्गाने उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. पोलिसांनी ठराविक कालावधीत परिसरातील रात्रीची गस्त वाढवावी, असे मत व्यापार्यांनी व्यक्त केले. यावर विचार केला जाईल असे शिवयोगी यांनी सांगितले.
बैठकीस दीपक वखारिया, विलास माळी, राजेंद्र पोतदार, उत्तम सांगावकर, हर्षल शेट्टी, मनोज पाटील, शिवाजी पेडणेकर, ओंकार पेडणेकर, संजय पोतदार यांच्यासह शहरातील व्यवसायिक उपस्थित होते.
