भंगार साहित्याचा वापर : लॉकडाऊन काळाचा सदुपयोग
निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना संसर्गामुळे उद्योग, व्यवसायाबरोबर शाळाही बंद राहिल्या. या काळात अनेकांनी विविध छंद जोपासले. मात्र निपाणी शहरातील आंदोलननगर, शाहूनगर परिसरात झोपडपट्टीत राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शिक्षकांच्या सहकार्याने भंगार साहित्यातून अनेक प्रकारची विज्ञान मॉडेल बनवले आहेत. आश्रय नगरमधील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ही किमया करून दाखविली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे खुद्द जिल्हा शैक्षणिक जॉईंट सेक्रेटरी राजू नाईक अक्षर दासोह समितीचे जिल्हाप्रमुख कुलकर्णी यांनी शिक्षकांसह या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. आश्रय नगर येथील उच्च प्राथमिक मराठी मूलांची शाळा इतर शाळेत प्रमाणे बंदच राहिली. या शाळेत भंगार वस्तू गोळा करणाऱ्या भटक्या कुटुंबातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. कोरोना काळात काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण दिले. पण या विद्यार्थ्यांना ना मोबाईल, ना लॅपटॉप पालकांकडून मिळाला नाही. तरीही या विद्यार्थ्यांनी फावल्या वेळेत भंगारातील साहित्य एकत्र करून विज्ञान शिक्षक एस. एस. परीट यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकारचे वैज्ञानिक मॉडेल्स तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे शैक्षणिक साहित्य बनवले आहे. शिक्षकांनी कोरोना काळामध्ये साधारणपणे 150 ते 200 प्रकारचे रंगीत शैक्षणिक साहित्य बनविले आहे. टाकाऊ वस्तूपासून बनवलेल्या वैज्ञानिक वर्किंग मॉडेल्समध्ये गवत कापणी यंत्र, फॉगिंग मशीन, व्याक्युम क्लिनर, मिक्सर, पवन चक्की, दळप कांडप यंत्र, विमान अशा साहित्याचा समावेश आहे. या सर्व साहित्याची बेळगाव जिल्ह्याचे जॉइंट डायरेक्टर राजू नाईक, अक्षर दासोह विभागाचे जिल्हाप्रमुख कुलकर्णी, तळवार यांनी निपाणी आश्रय नगर शाळेला भेट देऊन झोपडपट्टीमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे कार्य तसेच विद्यार्थ्यांना शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचे विशेष कौतुक करून प्रोत्साहन दिले. यावेळी गटशिक्षणाधिकारी रेवती मठद, शारीरिक शिक्षण अधिकारी एस. बी. जोडगे गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील शिक्षण संयोजक, निपाणी उत्तर व पूर्वचे सीआरपी बी. एस. लक्कणावर यांच्यासह शिक्षण खात्यातील विविध अधिकारी उपस्थित होते.
——-‘शहराबाहेरील आंदोलननगर, शाहूनगर परिसर मागास असून झोपडपट्टी धारकांची संख्या जास्त आहे. परिसरातील सर्व विद्यार्थी आश्रय नगर प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत त्यांनी त्यांच्या काळात भंगाराच्या साहित्यातून विज्ञान शिक्षक परीट यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विज्ञान मॉडेल बनवले आहेत. त्यामुळे झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांनीही आपले वेगळे टॅलेंट सिद्ध केले आहे.’- रेवती मठद, गटशिक्षणाधिकारी निपाणी.
——‘ग्रामीण भागासह मागास वसाहत येथील विद्यार्थ्यांमध्ये अनेक कलागुण दडलेले असतात. हे हेरून आपण लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तुपासून विज्ञान मॉडेल बनविण्यासाठी मार्गदर्शन केले होते त्यानुसार विद्यार्थ्यांनी अनेक सरस मॉडेल बनवले आहेत.’ – एस. एस. परीट, विज्ञान शिक्षक, मराठी प्राथमिक शाळा आश्रयनगर.