बेळगाव : बेळगाव महापालिकेसमोर कन्नड ध्वजस्तंभ 28 डिसेंबर 2020 रोजी स्थापित करण्यात आला होता. गेल्या सहा महिन्यांपासून ऊन, वारा आणि पावसामुळे फाटलेला ध्वज बदलण्याची मागणी होत आहे. जुना ध्वज काढून नवीन ध्वज लावण्याचा प्रयत्न कन्नड संघटनेचे कार्यकर्ते करत असताना पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला.
बेळगाव महानगर पालिकासमोर काही महिन्यांपूर्वी स्थापित केलेला लाल-पिवळा कन्नड ध्वजाच्या जागी नवा लाल-पिवळा ध्वज फडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ध्वज खराब झाल्याच्या पार्श्वभूमीवर कन्नड संघटनेचे नेते नवीन कन्नड ध्वज लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. आज ध्वजारोहण करण्यासाठी निघाले
तेव्हा त्यावेळी तेथे मार्केट विभागाच्या एसीपीसह अन्य अधिकारी आणि पोलीस दाखल झाले. पोलिसांनी नवा लाल-पिवळा झेंडा लावण्यासाठी हरकत घेतली.
पोलिसांनी 10 कार्यकर्त्यांना अटक केली.
यावेळी कन्नड संघटनेचे श्रीनिवास ताळूकर आणि एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. कन्नड कार्यकर्ते नवा झेंडा आणि दोरा घेवून आले होते. पोलिसांनी त्यांना अडवताच कन्नड कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. लाल पिवळा झेंडा लावायला विरोध करण्यामागे राजकारण आहे असा आरोपही कन्नड कार्यकर्त्यांनी केला. अखेरीस पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून शांतता प्रस्थापित केली.