रात्र गस्तीसह बाजारपेठेत पोलिसांचा वॉच : रेकॉर्डवरील आरोपींवर लक्ष
निपाणी (वार्ता) : दिवाळी सणानिमित्त अनेक जण परगावी गेले आहेत. शिवाय बाजारपेठेतही खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे निपाणीतील पोलिस प्रशासनही दिवाळीनिमित्त अलर्ट मोडवर आले असून रात्रगस्तीत वाढ केली आहे. पोलिस प्रशासन रेकॉर्डवरील आरोपींसह बाजारपेठेवर लक्ष ठेवून आहेत.
दिवाळीनिमित्त अनेक कुटुंबे परगावी जातात. त्यामुळे घराला कुलूप असते. याच काळात शहरासह उपनगर आणि ग्रामीण भागात चोरांकडून घरांवर डल्ले मारण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दिवाळी सणानिमित्त परगावी जाताना नागरिकांनी घरामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम ठेवून नये. तसेच शेजाऱ्यां ना बाहेरगावी जात असल्याची माहिती देण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तरीदेखील अनेक जण घरात सोन्याचे दागिने, रोख रक्कम ठेवून बाहेर गावी जातात. परिणामी चोरांकडून घरावर डल्ला मारल्यानंतर लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास होतो. बाजारपेठेत खरेदीसाठीआलेल्या नागरिकांवर अनेक वेळा गुन्हेगारांकडून पाळत ठेवली जाते. त्यामुळे पोलिस प्रशासनही दिवाळी सणानिमित्त अलर्ट मोडवर आले आहे. पोलिस प्रशासनाकडून रात्रगस्त वाढविण्यात आली आहे. शिवाय रात्रगस्त दरम्यान, पोलिस रेकॉर्डवरील आरोपी तपासले जात आहे. तसेच बाजारपेठेवरील गर्दीवर ही पोलिस लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे चोरीच्या घटना घडण्यापूर्वीच त्या रोखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
—
‘गेल्या काही महिन्यापासून आठवडी बाजारात मोबाईल व दागिने चोरीचे घटना घडल्या आहेत. सध्या दिवाळीनिमित्त बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. या काळातही असे प्रकार घडू शकतात. तसेच दिवाळी सणाच्या निमित्ताने अनेक कुटुंबे गावी जातात यावेळी सर्वांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.’
-संगमेश शिवयोगी, मंडल पोलीस निरीक्षक, निपाणी
—
घराच्या सुरक्षेसाठी हे करा
* परगावी जाताना घराला चांगले कुलूप लावा.
* घरात सोने, चांदीसह रोख रक्कम ठेवू नका.
* परगावी जाताना शेजाऱ्यांना माहिती द्या.
* शक्यतो घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्या.
* रात्रीच्या वेळी घराच्या परिसरात प्रकाशाची चांगली सोय करा.
Belgaum Varta Belgaum Varta