टेलर व्यवसायिक अडचणीत : रफू, अल्टरवर भर
निपाणी (वार्ता) : माणूस घालत असलेले कपडे हेसुद्धा माणसाचे व्यक्तिमत्व फुलविण्याचे काम करीत असतात. पण हे कपडे शिवणाऱ्या दर्जी म्हणजेच शिप्यांचा टेलरिंग व्यवसाय सध्या डबघाईला आला आहे. दोन वर्षे हा टेलरिंगचा व्यवसाय कोरोनामुळे संकटात सापडला होता. अगोदरच बदलते तंत्रज्ञान, रेडिमेड कपड्याचे उद्योग यामुळे टेलरिंग व्यवसायाला उतरती कळा लागली असून शिंपी लोक आता टेलरिंगचा व्यवसाय सोडून पोटापाण्यासाठी इतर व्यवसायाकडे वळत असल्याचे चित्र निपाणी व परिसरात दिसत आहे. रेडिमेड कपड्यांच्या मोठ्या उद्योजकाच्या गारमेंट कारखान्यासमोर टेलरिंग व्यावसायिक कमी पडूलागल्याने आयुष्याचा धागा विणता विणेना, सुई मिळेना जीवनाची असे म्हणण्याची वेळ शिंप्यांवर आली आहे.
पूर्वी दिवाळीच्या दिवशी नवीन कपडे घालायला मिळावे, याकरिता महिनाभर आधी कापड खरेदी करून टेलरकडे शिवायला टाकण्यासाठी आबालवृद्धांची गडबड असायची. मात्र आजकाल रेडिमेड फॅशनेबल कपड्यांचा बाजार चांगलाच फोफावला असल्याने शिवून घेण्याच्या भानगडीत आता कोणीच पडत नाही. त्यामुळे टेलर या असंघटित व्यवसायाला याची झळ सोसावी लागत आहे.
दिवाळीच्या तोंडावरचा महिना म्हणजे टेलरसमोर कामाचा डोंगर असायचा. मात्र आता कपडे खरेदीला पूर्वीसारखा दिवाळीचा मुहूर्त राहिला नाही. वर्षभरच खरेदी होत असल्याने दिवाळीत खरेदी करायच्या कपड्यांचे अप्रूप संपल्यात जमा आहे. जागोजागी मोठमोठी कपड्यांची दुकाने, सेल, मॉलही उघडले आहेत. त्याचा टेलरिंग व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे.
सर्वसामान्य नागरिकही हल्ली कापड विकत घेऊन टेलरकडून शिवून घेण्याऐवजी रेडिमेड कपडे विकत घेताना दिसत आहेत. त्यामुळे पारंपरिक टेलरचे काम रफू करणे, बटणे लावणे, उसवलेले शिवून देणे, चेन बसविणे एवढेच उरले आहे.
शिंपी लोकांचा शिलाईचा वाढत चाललेला दर तसेच कपड्याचे भावही जास्त, त्यामानाने रेडिमेड कपडे स्वस्त आणि मस्त आणि लगेचच मिळत असल्याने नागरिकांचा कल कपडे शिवून घालण्यापेक्षा रेडिमेड कपड्यांकडे वाढला आहे. शिंपी आपल्या गावपाड्यात शिलाई मशीन घेऊन लोकांचे कपडे शिवतो.पण गेल्या काही वर्षांपासून बाजारात रेडिमेड कपडे स्वस्त आणि मस्त येऊ लागल्याने लोकांचा कल कपडे शिवून घालण्यापेक्षा रेडिमेड कपडे घेण्याकडे ओढा जास्त आहे. त्यामुळे टेलरिंग व्यावसायिक काही वर्षांपासून चिंताग्रस्त बनले आहेत.
————————————————————–

‘फॅशनेबल रेडिमेड कपडे बजेटमध्ये मिळत असल्याने आमचा धंदा ६० टक्क्यांपर्यंत कमी आला आहे. वयस्कर नागरिक आल्टर किंवा नवीन कपडे शिवून घेण्यासाठी जास्त प्रमाणात येतात. या ग्राहकांवरच आमचा प्रपंच सुरू आहे.
आजकालचे तरुण फार कमी प्रमाणात ड्रेस शिवून घेत आहेत. त्यांचा तयार कपड्याकडे ओढा वाढला आहे.’
– बबन चौगुले, टेलर, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta