निपाणी (वार्ता) : घाटगे-पाटील इंडस्ट्रीजने संरक्षण मंत्रालयासाठी बनविलेल्या दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनांसाठी भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने ’रक्षा सृजनरत्न’ पुरस्कार देण्यात आला. संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्या हस्ते गुजरातमधील गांधीनगरमध्ये झालेल्या इंडो एक्स्पो प्रदर्शनात हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती घाटगे-पाटील इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पाटील म्हणाले, ’भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड म्हणजेच बीईएमएल या भारत सरकारच्या कंपनीसाठी विविध यंत्रांचे आणि वाहनांचे काही महत्त्वाचे भाग बनविण्याचे काम घाटगे-पाटील इंडस्ट्रीज गेली पन्नासहून अधिक वर्षे करत आहे. या पन्नास वर्षांमध्ये शंभरहून अधिक असेंब्लीज घाटगे-पाटील इंडस्ट्रीजने विकसित केल्या आहेत. भारत सरकारच्या ’मेक इन इंडिया’ या धोरणात्मक योजनेनुसार स्वदेशीनिर्मित वस्तूंना प्राधान्य देण्याच्या हेतूने आयात पर्यायया श्रेणीअंतर्गत भारतीय संरक्षण खात्यासाठी हेवी ड्यूटी टाट्रा ट्रकसाठी टाट्रा विंच आणि स्टेअरिंग गिअर बॉक्स ही असेंब्ली विकसित केली. सर्वोत्कृष्ट गुणवत्ता आणि त्यामध्ये राखलेले कायमचे सातत्य यासाठीच संरक्षण मंत्रालयाने रक्षा सृजनरत्न पुरस्कार दिला आहे.
घाटगे-पाटील इंडस्ट्रीजने बनविलेल्या हेवी ड्यूटी टाट्रा ट्रकचे टाट्रा विंच आणि स्टेअरिंग गिअर बॉक्स या असेंब्लीचे वैशिष्ट्य असे की हेवी वेट टँक लोड किंवा अनलोड केले जातात. तसेच युद्धजन्य स्थितीमध्ये सैनिक आणि वाहनांच्या सुटकेसाठी याचा उपयोग केला जाऊ शकतो. ही संपूर्ण असेंब्ली कोल्हापुरातील अभियंत्यांनी बनविली असल्याचा अभिमान असल्याचे किरण पाटील यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला घाटगे-पाटील इंडस्ट्रीजचे आदित्य पाटील, विजय संकपाळ, फत्तेसिंह जाधव आदींसह उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta