अध्यक्ष बाळासाहेब देसाई -सरकार ६ नोव्हेंबर रोजी भर उरुस
निपाणी (वार्ता) : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखले जात असलेल्या निपाणी येथील संत बाबा महाराज चव्हाण प्रस्थापित महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीरसाहेब यांचा उरुस यंदा ५ ते ७ नोव्हेंबर या काळात होणार आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा मोठ्या प्रमाणात उरुस साजरा करण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती उरुस उत्सव कमिटी अध्यक्ष, नगरसेवक बाळासाहेब देसाई- सरकार यांनी दिली. येथील चव्हाणवाड्यात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
बाळासाहेब देसाई म्हणाले, सोमवारपासून अभ्यंगस्नानाने उरुसाचे विधी सुरू आहेत. २६ पासून चव्हाणवाडा व दर्गा देवस्थान येथे ताशा, सनई वादनास सुरुवात होणार आहे. २ नोव्हेंबर रोजी चव्हाण वारसांच्या हस्ते मंडप चढविणे, ४ नोव्हेंबर रोजी चव्हाण वारसांच्या हस्ते चुना चढविला जाणार आहे. ५ नोव्हेंबर रोजी गंधरात्र असून गंध चव्हाणवाड्यातून मिरवणुकीने निघणार आहे. या दिवशीच बेडीवाल्यांचा उरूस आहे. ६ नोव्हेंबर रोजी भर उरूस असून यादिवशी चव्हाणवाड्यातून येणारा गलेफ पहाटे चढविण्यात येणार आहे. ७ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिजामाता चौक, चव्हाणवाडा येथे खारीक व उदीचा कार्यक्रम होणार आहे. या दिवशीच शिळा उरूस आहे.
८ नोव्हेंबर रोजी मानाचे फकीर यांची रवानगी व भंडारखाना तसेच १० रोजी पाकळणी कार्यक्रम होणार आहे. उरूस काळात ५नोव्हेंबर व ७ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता चव्हाणवाडा येथे आतषबाजी होणार आहे. उरुसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता अंमलझरी रोडवरील आंबेडकर नगरात शर्यतींच्या आयोजन करण्यात आले आहे. ओपन गावगन्ना बैलगाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ५ हजार १ रुपयेव ढाल, ३ हजार १ रुपये व २ हजार १ रुपये बक्षीस दिले जाणार आहे. घोडा बैलगाडी शर्यतीसाठी ३ हजार १ रुपये व ढाल, २ हजार १रुपये व १ हजार १रुपये रुपये,घोडागाडी शर्यतीसाठी ३ हजार१ रुपये व ढाल, ३ हजार १ रुपये व १ हजार १ रुपये असे बक्षीस दिले जाणार आहे.
७ रोजी कुस्त्यांचे मैदान, ६ रोजी रात्री साडेनऊ वाजता जुगलबंदी कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी दुपारी 3 म्युनिसिपल हायस्कूल येथील संत बाबा महाराज चव्हाण कुस्ती मैदानात भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व उरूस कार्यक्रम शांततेत पार पाडावा, यासाठी नगरपालिका, पोलीस प्रशासन यांच्या सहकार्याने आवश्यक ते नियोजन करण्यात आल्याचे बाळासाहेब देसाई सरकार यांनी सांगितले. यावेळी दर्ग्याचे सेवेकरी इम्तियाज मुजावर यांचा उत्सव कमिटी व चव्हाण वारस यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. जयराम मिरजकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस पृथ्वीराज चव्हाण, सुजय देसाई, राजू निपाणकर, विवेक मोकाशी, संजय माने, प्रभाकर पाटील, संग्राम देसाई, सरकार, रणजीत देसाई सरकार, शरद माळगे, श्याम कांबळे, बाळासो पोतदार यांच्यासह उत्सव कमिटीचे सदस्य, मानकरी व सेवेकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta