निरंतर कार्यवाहीमुळे लागली वाहतुकीला शिस्त : वाहनधारकासह नागरिकांतून समाधान
निपाणी (वार्ता) : काही महिन्यांपासून निपाणी शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने दसरा, दिवाळीसह आठवडी बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने थांबविण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारक रस्त्यावर वाहने लावून तासनतास खरेदी करीत आहेत. त्यामुळे बसस्थानक परिसर, साखरवाडी, निपाणी मेडिकल, कित्तूर चन्नम्मा चौक परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन जिल्हा पोलिसप्रमुखांच्या आदेशानुसार निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षिका कृष्णवेणी गुर्लहोसूर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक चंद्रशेखर यांच्या मार्गदर्शनानुसार गेल्या महिन्यापासून दिवसभर वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. ही मोहीम सकाळी नऊ वाजल्यापासूनच रात्री आठ वाजेपर्यंत जोरदारपणे राबविण्यात आली. पोलिसांच्या या मोहिमेला अखेर यश आले असून आता शहरातील सर्वच रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने सुरळीतपणे सुरू असल्याचे चित्र निपाणीकरांना पहावयास मिळत असून पोलिसांच्या या कामगिरीला शहरवाशांनी सॅलुट दिला आहे.
दसरा दिवाळीसह आठवडी बाजाराच्या दिवशी शहरातील मुख्य रस्त्यासह बाजारपेठेतील सर्वच रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत होती. अशातच बसस्थानकाजवळील धर्मवीर संभाजी चौकातील ट्राफिक सिग्नल यंत्रणा बंद आहे. तरीही शहर पोलिस ठाण्यातर्फे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी दररोज पोलिसांची नियुक्ती केली जात होती. तरीही वाहतुकीची कोंडी सुटलेली नव्हती. ही बाब लक्षात घेऊन महिनाभरापासून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू झाला. येथील बसस्थानक परिसर, निपाणी मेडिकल भाग, कित्तूर चन्नम्मा सर्कलमधील कोंडी लक्षात घेऊन तेथे दिवसभर पोलिसांकडून मार्गदर्शन केले. दररोज सकाळपासूनच मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षिका कृष्णवेणी गुर्लहोसुर, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी यांच्यासह तीनही पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. त्यामुळे आता वाहतुकीची कोंडी कमी झाली आहे.
———————————————————
अनेक ठिकाणी पार्किंगची व्यवस्थाच नाही
शहरातील प्रमुख रस्ते आणि बाजारपेठेत असणाऱ्या दुकानदारांना पार्किंगची व्यवस्था करूनच बांधकामाला परवानगी देणे आवश्यक होते. पण आज तक आहेत कोणत्याही व्यवसायिक दुकानासमोर पार्किंगला जागा शिल्लक नाही. त्यामुळे ग्राहक रस्त्यावरच वाहने थांबवून बाजार करत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
——————————————————–
हातगाड्यावर कारवाई
शहरातील सर्वच रस्त्यावर दुतर्फा अनेक हात गाडीवाले फळांचे गाडी घेऊन फिरत आहेत. त्यांना समज देऊन सर्वच गाडी हटविण्यात आल्याने रस्ता वाहतुकीस खुला झाला आहे.
———————————————————-
‘वाहनधारकांची संख्या वाढल्याने शहरातील सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा पोलिसप्रमुखांच्या आदेशानुसार महिनाभरापासून वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पुढील काळात वाहनधारकांनी आपली वाहने पार्किंगमध्ये लावून सहकार्य करावे, अन्यथा दंडात्मक कारवाईचा बडगा उचलला जाईल.’
– संगमेश शिवयोगी, मंडल पोलिस निरीक्षक, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta