दोन वर्षापासून मागणी ठप्प : ऑनलाईन शिक्षणाचा परिणाम
निपाणी (संजय सूर्यवंशी) : कोरोना संसर्गामुळे गेल्या वर्षापासून अनेक उद्योग व्यवसायांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातून शैक्षणिक साहित्य विक्रीचा व्यवसायही वाचलेला नाही. शाळकरी मुलांपासून जाणत्या माणसांपर्यंत सर्वांनाच काही ना काही खरेदीसाठी स्टेशनरी दुकानात जावे लागते. कोरोनाची सर्वाधिक झळ स्टेशनरी दुकान चालकांना बसली आहे. परिणामी खरेदी विक्री ठप्प असल्याने शैक्षणिक साहित्य विक्रीची दुकाने निरक्षर बनले आहेत. बीड वर्षभरापासून प्राथमिक शाळा, हायस्कूल, महाविद्यालये बंद असल्याने स्टेशनरी दुकानातील उलाढालीवर परिणाम झाला आहे. परिणामी स्टेशनरी विक्रेत्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागत असून दुकानभाडे व कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना दमछाक होत आहे. छोट्या छोट्या साहित्याने भरलेल्या स्टेशनरी दुकानात किरकोळ वाटणारे आणि महत्वपूर्ण असे साहित्य मिळते. निपाणी शहर व ग्रामीण भागात 100 पेक्षा अधिक स्टेशनरी दुकाने आहेत. दीड वर्षापासून ही सर्व दुकाने बंद असल्याने व्यापार थंडावला आहे. गतवर्षीही लॉकडाऊन सुरू होताच दुकाने सलग 3 महिने बंद ठेवावी लागली. त्यानंतर दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली. मात्र शाळा महाविद्यालय सुरू न झाल्याने विक्री ठप्प झाली. त्यामुळे दुकाने सुरू राहूनही नुकसानच सहन करावे लागले. स्टेशनरी दुकानात टाचणपासून रबर, कागद, स्टेपनर, वह्या, पेन, कैलकुलटर विविध प्रकारचे कागद उपलब्ध असतात. काही विक्रेत्यांनी भाडोत्री जागेत हा धंदा सुरू केला आहे. शहर ग्रामीण भागातील 50 टक्के विक्रेत्यांचे दुकान भाडेतत्वावर आहेत. सध्या दुकान बंद असले तरी जागेचे भाडे द्यावेच लागत आहे. हे भाडे देताना आणि घरखर्च चालवताना स्टेशनरी विक्रेत्यांना कसरत करावी लागत आहे. काही दुकानात कामगारही ठेवण्यात आले आहेत. या कामगारांचा रोजगार गेला असून त्यांची परिस्थितीही गंभीर बनली आहे. स्टेशनरी दुकानातील मालाला विशेषत: मे, जून महिन्यात अधिक मागणी असते. मात्र गतवर्षीप्रमाणे यंदाही शाळा अद्याप बंदच असल्याने मोठे नुकसान झाले आहे. या व्यवसायातील व्यक्तींना अन्य पर्याय नसल्याने उदरनिर्वाह कसा करायचा, हा प्रश्न भेडसावत आहे. स्टेशनरी व्यवसायात नवीन येणाऱ्यांची संख्या अधिक असून कोरोनामुळे त्यांना मोठा फटका बसला आहे. संकट काळात शासनाने मदत करण्याची मागणी होत आहे.
‘कोरोना संसर्गामुळे शाळा महाविद्यालये बंद आहेत. पण ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू असल्याने विद्यार्थ्यांना स्टेशनरी साहित्याची गरज भासत आहे. पण दुकाने बंद असल्याने त्यांची अडचण होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी शासनाने स्टेशनरी दुकान उघडण्यासाठी परवानगी द्यावी.’ – वीरकुमार गुंडे, स्टेशनरी व्यवसायिक, निपाणी.
——-एक नजर…
* निपाणी शहरात लहान मोठी 25 दुकाने. * ग्रामीण भागात 80 शैक्षणिक साहित्य विक्रेते. * ऑनलाईन शिक्षणामुळे खरेदी ठप्प. * दोन वर्षापासून आर्थिक फटका.