कोगनोळी : ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणीसाठी साखर कारखान्याच्या कार्यालयाकडे हेलपाटे घालून अक्षरशः मेटाकुटीला आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. साखर कारखान्याने केलेला अपुरा मजुरांचा पुरवठा यामुळे बहुतांशी शेतकरी हे ऊसतोडीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांच्या उसांना तुरे फुटले आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी ऊस वाळत आहे. तरीदेखील कारखाना ऊसतोडणी देऊन शेतकऱ्यांची मदत करीत नसल्याची भावना शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे.
यंदाच्या वर्षी ऊसदर आंदोलन जवळपास दीड महिना चालल्याने आलेले कामगार शेजारच्या राज्यामध्ये ऊसतोडणीसाठी गेले. ते परत ऊसतोडणीसाठी कारखान्याकडे आले नाहीत. त्यामुळे कारखानेही हतबल झाल्याचे बोलले जात आहे. यातच पावसाने ओढ दिल्याने ऊसाची वाढ जेमतेम झाली आहे. त्यामुळे अनेक ऊसतोड मजुर ऊसतोडणीसाठी तयार होत नाहीत. जर कोणी तयार झाले तर शेतकऱ्यांकडून भरमसाठ रक्कमेची मागणी केली जाते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
या परिसरात अनेक अल्पभूधारक शेतकयांचे प्रमाण अधिक असल्याने ऊसतोडणी यंत्र ही अनेक ठिकाणी चालत नाहीत. ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या कमी असल्याने वेळेवर तोडणी मिळत नाही. अनेक शेतकऱ्यांनी ऊस घालवून त्याच शेतामध्ये ज्वारी, हरभरा किंवा अन्य पीके घेण्याचे ठरवले होते. मात्र ऊस लवकर जात नसल्याने शेतकऱ्यांचा हा अन्य पीके घेण्याचा मानस पूर्णतः उधळला आहे.