निपाणी (चिक्कोडी): गेल्या दोन दिवसांपासून चिक्कोडी उपविभागातील सर्व तालुक्यात दमदार पाऊस सुरू आहे. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातही धुव्वाधार पाऊस झाल्याने दूधगंगा, वेदगंगा नदी पात्राबाहेर पडली असून कृष्णा नदीच्या पातळीत ३ फुटांनी वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. १७) निपाणी व चिक्कोडी तालुक्यातील दूधगंगेवरील ४ व वेदगंगेवरील ३ असे ७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
हुक्केरी तालुक्यात संकेश्वर नजीकच्या हिरण्यकेशी नदीवरील पाणीपातळीत वाढ झाली आहे. पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास सर्व नद्यांना महापूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. वेदगंगा नदीवरील जत्राट-भिवशी, सिदनाळ-अक्कोळ, भोजवाडी-शिवापूरवाडी या तीन बंधाऱ्यावर पाणी आले आहे. दुधगंगा नदीवरील बारवाड-कुन्नूर, कारदगा-भोज, मलिकवाड-दत्तवाड व एकसंबा-दत्तवाड हे चार बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
दुधगंगेवरील जुना सदलगा-बोरगाव या बंधाऱ्यावरही पाणी आले आहे. कृष्णा नदीवरील मांजरी-बुवाची सौंदत्ती बंधारा पाण्याखाली गेला आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास रात्रीपर्यंत हिरण्यकेशी नदीवरील गोटूर बंधाऱ्यावर पाणी येण्याची शक्यता आहे. बंधारा पाण्याखाली गेल्यास महाराष्ट्रातील गडहिंग्लज तालुक्यातील वाहतूक ठप्प होणार आहे.चिक्कोडी उपविभागातील सर्व तालुक्यात गुरुवारी (ता. १७) पाऊस होता. महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात शुक्रवार अखेर असाच पाऊस राहिल्यास यंदाही महापूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अथणी, कागवाड, रायबाग, हुक्केरी तालुक्यात दमदार
अथणी, कागवाड, रायबाग, हुक्केरी तालुक्यात देखील पावसाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून होणाऱ्या दमदार पावसामुळे जनजीवन गारठले आहे. अथणी, कागवाड, रायबाग तालुक्यातील कृष्णा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास कृष्णेवरील कुडची पुलावर पाणी येऊन कर्नाटक-महाराष्ट्रातील वाहतूक ठप्प होण्याच्या धोका आहे.