Wednesday , May 29 2024
Breaking News

शाहू साखर कारखाना ठरला ‘आयएसओ’ मानांकनाचा मानकरी

Spread the love

कोल्हापूर : कागलच्या शाहू साखर कारखान्याला TUV Rhienland यांचेकडून ISO 14001:2015 आणि ISO 45001:2018 ही मानांकने मिळाली आहेत. अशी सर्व मानांकने मिळविणारा छत्रपती शाहू साखर कारखाना हा देशातील पहिला साखर कारखाना ठरला आहे. आजवर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील 62 पुरस्कारांचा मानकरी ठरलेल्या शाहूच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे, अशी माहिती शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

ते पुढे म्हणाले, ISO 14001: 2018 हे मानांकन पर्यावरण व्यवस्थापन कार्यपध्दतीसाठी आहे. कारखान्यामध्ये चालणाऱ्या प्रक्रियांचा अभ्यास करून यामधून निर्माण होणाऱ्या प्रदुषकांचे प्रमाण कमी होण्यास मदत या कार्यपध्दतीमुळे होते. तसेच प्रक्रियेसाठी पाणी, वीज आणि वाफ यांचा काळजीपूर्वक व योग्य प्रमाणात वापर करणेसाठी होतो.

ISO 45001:2018 ( व्यावसाईक आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन कार्यप्रणाली ) कारखान्यामध्ये काम करत असताना कामगार व कर्मचारी तसेच कारखान्यातील इतर लोकांना कोणतीही इजा व अपघात होऊ नये यासाठी कामाच्या जागेची सुरक्षितता धोक्याची संभाव्यता लक्षात घेऊन त्यांची पूर्वतयारी, योग्य सुरक्षित साधनांचा पुरवठा व वापर या कार्यपध्दतीमध्ये केला जातो. कामगार, कर्मचारी व काम करणारे इतर कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी यांना सुरक्षिततेबद्दलचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होते.

त्या शेतकऱ्यांच्या ऋणातून उतराई होणे शक्य नाही

काळाची गरज लक्षात घेऊन सर्वात आधी योग्य तो बदल करण्याची ‘शाहू’ व्यवस्थापनाने परंपरा कायम ठेवल्यामुळेच पहिल्या गळीत हंगामात कसेबसे ७३ हजार मे.टन ऊस गाळप करणारा ते आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा कारखाना अशी झेप घेतली आहे. १९७५ साली राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन ज्या सभासद शेतकऱ्यांनी भागभांडवल गोळा करून कारखाना उभारणीस हातभार लावला. सातत्याने ऊस पुरवठा केला. शाहूच्या व्यवस्थापनावर सार्थ विश्वास दाखविला. ते सर्व सभासद शेतकरी या यशाचे मानकरी आहेत. त्यांच्या या ऋणातून कधीही उतराई होता येणार नाही. अशी कृतज्ञता घाटगे यांनी शेवटी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर शाहू साखर ब्रँड

छत्रपती शाहू साखर कारखान्याने नेहमीच ऊस उत्पादक शेतकरी हा केंद्रस्थानी मानून शेतकऱ्यांचे हित, गुणवत्तापूर्ण उत्पादनांची निर्मिती, विक्री कौशल्य, आर्थिक व कामामधील शिस्त यावर आधारीत कार्यसंस्कृतीचा सुरूवातीपासून अवलंब केला आहे. कारखान्याची शाश्वत प्रगती करताना शेतकरी, ग्राहक, कर्मचारी या घटकांच्या गरजा व अपेक्षांचा विचार केला आहे. कारखान्याकडे होणाऱ्या प्रक्रियांमुळे पर्यावरणास धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेतली आहे. उच्च गुणवत्तापूर्ण उत्पादने औद्योगीक व आंतरराष्ट्रीय ग्राहकांना पुरवून ‘शाहू’ साखरचा एक वेगळा ब्रँड आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, निष्ठावान शिलेदार काळाच्या पडद्याआड

Spread the love  कोल्हापूर : काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *