चिकोडी : ‘हायकमांडने सांगितल्यास राजीनामा देईल’ या मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्यास महिला व बाल कल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांनी नकार दिला. मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत, अफवा काय येत असतात, जात असतात असे जोल्ले यांनी सांगितले.
यासंदर्भात सोमवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना मंत्री जोल्ले म्हणाल्या, महापूर असो वा कोरोनासारखे संकट, मुख्यमंत्री समर्थपणे काम करत आहेत. महापूर आल्यावर मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी धाव घेत सर्वाना मदत केली आहे. त्यामुळे राजीनाम्याबाबतच्या त्यांच्या विधानावर मी कसलीही प्रतिक्रिया देणार नाही. हायकमांड जो निर्णय घेईल त्याला आम्ही व मुख्यमंत्री बांधील राहू असे त्यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आई-वडील गमावलेली १९ अनाथ मुले आहेत. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला आहे. अशा मुलांसाठी मुख्यमंत्री बाळ सहाय्य योजना आखली असून त्याअंतर्गत अशा प्रत्येक मुलाच्या खात्यावर दरमहा ३५०० रुपये अर्थसाह्य जमा करण्यात येईल. त्यांना कित्तूर राणी चन्नम्मा आणि मोरारजी निवासी शाळांमध्ये मोफत शिक्षण देण्यात येईल. काही मुलांनी त्यांचे खासगी शाळातील शिक्षण पुढे सुरु ठेवण्याची विनंती केली आहे ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. अनाथ मुलींना २१ वर्षे पूर्ण झाल्यावर १ लाख रुपये देण्यात येतील. त्याचप्रमाणे दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना लॅपटॉप देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मुलांना अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर विशेष मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने लस द्यावी अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यानंतर त्यांनी व आरोग्य सचिवांनी तसा आदेश जारी केला आहे. शिवाय अंगणवाडीत मुलांसाठी स्वयंपाक करणाऱ्या महिलांनाही प्राधान्याने लस देण्यास त्यांनी मान्यता दिली आहे त्याबद्दल त्यांची ऋणी आहे असे मंत्री जोल्ले यांनी सांगितले.