Friday , September 20 2024
Breaking News

रोहिणी बाबुराव पाटील यांची राज्य ज्युडो प्रशिक्षकपदी निवड

Spread the love

बेळगाव : क्रीडा क्षेत्रातील मानाचा एकलव्य पुरस्कार विजेत्या चंदगडच्या सुकन्या सुप्रसिद्ध ज्युडोपटू रोहिणी बाबुराव पाटील यांची बेळगाव जिल्हा युवा सशक्तिकरण आणि क्रीडा खात्याच्या (डीवायईएस) राज्य ज्युडो प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
बेळगावशी निकटचा संबंध असणाऱ्या रोहिणी पाटील यांनी ‘ए’ ग्रेड एनआयएस पदविका प्राप्त केली असून त्या हिंदी भाषा घेऊन एमए. एम. फिल झाल्या आहेत.
याप्रकारे उच्चशिक्षित असणाऱ्या रोहिणी यांचे ज्युडो प्रकारातील निर्विवाद प्रभुत्व आणि त्यांनी आपल्या गावासह राज्याच्या नावलौकिकात घातलेला भर लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने गेल्या 2008 साली त्यांना क्रीडा क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा एकलव्य पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
त्याप्रमाणे कर्नाटकच्या तत्कालीन राज्यपालांनी 2009 मध्ये त्यांना ज्युडोतील केओए पुरस्कार प्रदान केला आहे. तत्पूर्वी ज्युडो क्रीडा प्रकारातील असामान्य प्राविण्य लक्षात घेऊन केंद्र सरकारने रोहिणी यांना 60 हजार रुपयांची शिष्यवृत्ती देखील दिली होती. रोहिणी पाटील यांना त्यांच्या प्रारंभीच्या काळात म्हणजे 2003 सालापासून त्रिवेणी सिंग आणि जितेंद्र सिंग या मातब्बर ज्युडो प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.
2008 -09 साली नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित दक्षिण आशियाई ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक हस्तगत करणाऱ्या रोहिणी पाटील यांनी 2006 -07 सालापासून ज्युडो क्रीडा प्रकारात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी बजावत अनेक पुरस्कार व मानसन्मान मिळवले आहेत.
राष्ट्रीय पातळीवरील ज्युडो प्रशिक्षण शिबिरांमध्ये भाग घेतला असल्यामुळे त्यांच्या गाठीशी ज्युडो प्रशिक्षणाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हा युवा सशक्तिकरण आणि क्रीडा खात्याच्या (डीवायईएस) राज्य ज्युडो प्रशिक्षक पदाची धुरा त्या समर्थपणे सांभाळू शकतील असा विश्वास जाणकारांमध्ये व्यक्त केला जात असून प्रशिक्षकपदी निवडी झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

ऑपरेशन थिएटरमध्येच ऑपरेशन करताना बासुरी वाजवतच रुग्णाची मेंदूची जटील शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये यशस्वी

Spread the love  अशाप्रकारच्या जटील व जोखमीच्या मेंदूच्या १०२ अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटल अनोखा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *