Tuesday , October 15 2024
Breaking News

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी फुंकले रणशिंग; १६ जूनला कोल्हापुरात पहिला मोर्चा!

Spread the love

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक करून घेतला हा सुवर्णक्षण बहुजनांसाठी पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे जाणारा होता. त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांच्या उद्धारासाठी आरक्षणाचा निर्णय घेतला. आज बहुजनांतील सर्व जातींना आरक्षण आहे पण मराठा समाजाला नाही. मराठा समाजाची वाताहात होत असताना आम्ही बोलायचे नाही का? आमचा खेळ केला तर आम्ही गप्प बसणार नाही. शाहु महाराजांच्या समाधीस्थळापासून येत्या १६ जूनपासून मोर्चाला प्रारंभ करणार असल्याची घोषणा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. मुंबई ते पुणे मार्च काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

रायगडावर शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यात ते बोलत होते. यंदा मोजक्या शिवभक्तांसह उत्साहात शिवराज्याभिषेक सोडला संपन्न झाला. यावेळी संभाजीराजे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संबोधित केले. संभाजीराजे म्हणाले की, ‘चारशे वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी छत्रपती झाल्यानंतर शपथ घेतली की, माझे स्वराज्य सुराज्य व्हावे. महाराजांनी तत्कालिन परिस्थितीत राज्याभिषेक का करून घेतला याचा अभ्यास करण्याची गरज आहे. मराठा समाजाच्या म्हणजे अठरा पगड जातीची लोकं वेगळ्या वेगळ्या शाह्यांमध्ये चाकरी करत होते. आपल्यातच लढाया होत होत्या. हे बंद करायचे होते. म्हणून अठरा पगड जातींना स्वराज्यात आणल्या आणि सार्वभौम राजा झाले. पहिले स्वातंत्र्य शिवाजी महाराजांनी मिळवून दिले म्हणूनच हा खरा स्वातंत्र्यदिन आहे.

आज देशभरात कुठल्या राजाचे असे स्मरण करतो असा राजा दाखवा. हे आपले वैभव आहे.  शिवराज्याभिषेक सोहळा व्यापक व्हावा. तो जगभर जावा, शिवाजी महाराज विश्ववंदनीय व्हावे यासांठी आम्ही हा सोहळा सुरू केला. आज लाखो लोक देशभराच्या कानाकोपऱ्यातून येतात. म्हणून हा लोकोत्सव झाला. हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा झाला पाहिजे. या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे संकट आले आहे. मागील वर्षी २५ जण आलो. यंदाही कमी शिवभक्त आलोय. मीही शिवभक्तांना आवाहन केले की, या संकटात कुणीही रायगडावर येऊ नका. आपण जगलो तर महाराजांचे आचार विचार पोहाचवू शकतो हीच भावना माझ्या आवाहनामागे होती. सरकारचीही परवानगी नसल्याने अनेकजण नाराज झाले. सध्या कोरोना संसर्गाचा मोठा धोका आहे. त्यामुळे शिवभक्तांचा जीव धोक्यात घालणे मला योग्य वाटत नाही. मी समाजाला वेठीस धरून, लोकांचा जीव धोक्यात घालून हा सोहळा करणार नाही. लोकांच्या जीवाशी खेळणे हे माझ्या रक्तात नाही. आज मी तुम्हाला का रोखले हे तुम्हाला १० वर्षांनी कळेल. तेव्हा माझी आठवण काढाल. तुम्हाला वाटत असेल की,  जर मी चुकीचा वागलो असेन तर मी दिलगीरी व्यक्त करतो.’

मराठा आरक्षणाबाबत बोलताना ते म्हणाले, मी नेहमी बहुजन समाजाचे विषय मांडत आलो आहे. रायगडावर नेहमीच मी राजकारण विरहित बोलतो. मी राजकारणी नाही. राजकारण जवळपास येऊ देत नाही. पण समाजाचे नुकसान होत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. मराठा समाज वाईट परिस्थिीतीतून जात असताना मी बोलायचे नाही? शिवाजी महाराजांची अठरा पगड जातीचे राज्य केले. पुढे राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले त्यात मराठा समाज होता. आज इतर सर्व समाजांचे आरक्षण आहे पण मराठ्यांना आरक्षण नाही. तरीही आम्ही आवाज उठवायचा नाही. २००७ पासून मी महाराष्ट्र पिंजून काढला. आमचा हक्क आम्ही मागितला. ज्या आनंदाने बहुजन समाज नांदत होता त्या आनंदासाठी, बहुजन समाजासाठी मी बाहेर पडलो. अनेक आंदोलने केली. पण दुर्देवाने आमच्या मागण्या मान्य होत नाहीत. मराठा आरक्षणाबाबत भाजप सरकार असताना म्हणत होते की, आघाडी सरकारने काहीच केले नाही. महाविकास आघाडी सरकार म्हणते की, मागच्या सरकारने कायदाच बोगस केला. ही विनाकारण भांडणे सुरू आहेत. लोकांनी तुम्हाला निवडून दिलेय तरीही लोकांना वेठीस धरता? हा सगळा खेळ चालला आहे. जर तुम्ही मराठ्यांचा खेळ करणार असणार असाल तर आम्ही गप्प बसायचे? मी सरकारला तीन पर्याय दिले होते. पहिला पर्याय म्हणजे रिव्युपिटिशन दाखल करा. पण कोर्ट ते स्वीकारत नाही. रिट पिटीशनचाही पर्याय होता. तिसरा पर्याय मागासवर्ग आयोगाचा. हा आयोग स्थापन करून राज्याचा अहवाल राष्ट्रपतींना द्यायचा. राष्ट्रपती तो अहवाल केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देईल. तेथून तो संसदेत चर्चेला जाईल. त्यानंतर तेथून आरक्षणाचा मार्ग निघू शकतो. मात्र, याबाबत काहीच हालचाली होत नाहीत. कोण चुकले कोण बरोबर हे आम्हाला पहायचे नाही. आम्हाला न्याय हवा आहे. ते तुम्ही करू शकता का हेच आम्हाला पहायचे आहे. आमचा तुम्ही खेळ करणार असाल तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले. त्यामुळेच १६ जून रोजी मराठा समाजा रस्त्यावर उतरेल. कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीपासून मोर्चा काढू. वेळ पडली तर कोल्हापूर ते मुंबई लाँग मार्चही काढू. मराठा समाजाची वाताहात होत असताना मी गप्प बसावे असे कुणाला वाटत असेल तर ते चूक आहे.’

रायगडावरील कामे शास्त्रोक्त पद्धतीने

रायगड प्राधिकरणामार्फत सुरू असलेले रायगडाचे संवर्धन आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने सुरू आहे. पुरातत्व विभागाचे काम चुकीचे आहे असे नाही त्यांनाही काही मर्यादा आहे. रायगडाचे संवर्धन झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. रायडावरील प्रत्येक काम आम्ही शिवकालीन पद्धतीने होईल असे पाहत आहोत. रायगडावर मिळालेल्या सर्व वस्तू आम्ही शिवभक्तांसाठी खुले करून देऊ. रायगडावरील सर्व टाक्याचे गाळ काढले आहेत. हे काम उत्कृष्ट दर्जाचे होईल, असेही संभाजीराजे म्हणाले.

About Belgaum Varta

Check Also

“प्रेयसी एक आठवण” या सत्य प्रेम स्वरूप कादंबरीवर आधारित निघणार चित्रपट..

Spread the love  ठाणे : ” प्रेयसी एक आठवण ” ही सत्य प्रेम स्वरूप कादंबरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *