Saturday , July 27 2024
Breaking News

शिवराज्याभिषेक सोहळा छत्रपतीच्या उद्यानात यंदा साधेपणाने साजरा

Spread the love

बेळगाव : अत्यंत मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टस्टिंग पाळून अगदी साधेपणाने रविवारी सकाळी 6 वाजता छत्रपती शिवाजी उद्यानात शिवजयंती चित्ररथ महामंडळ बेळगाव व शिवराज्याभिषेक उत्सव मंडळ बेळगावच्यावतीने आज 348 वा शिवराज्याभिषेक ( शिवस्वराज ) दिन साजरा करण्यात आला.

यंदा करोनामुळे दरवर्षीसारखा जोश नव्हता. दरवर्षी 6 जूनला छत्रपती शिवाजी उद्यानात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या संख्येने शिवभक्तांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.

यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा साधेपणाने करण्याचा निर्णय शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्यावतीने सुनील जाधव यांनी जाहीर केला. त्यानुसार ते निवडक कार्यकर्त्यांसह रविवारी छत्रपती शिवाजी उद्यानात पोहोचले. रविवारी सकाळी 6 वाजता शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांच्या हस्ते भगवा ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मराठा परिषदचे अध्यक्ष व आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी उद्यानातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवमूर्तीवर विविध रंगाचा जलाभिषेक व दुग्धाभिषेक झाला व विधीवत पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी श्रीफळ वाढविले. तर आमदारांच्या हस्ते आरती झाली. आदित्य पाटील व प्रमोद कंग्राळकर यांनी शिवरायांची आरती, ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र म्हटला. छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार करीत रविवारी शिवराज्याभिषेक सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला.

यावेळी अनिल बेनके म्हणाले शिवभक्तांनी कोरोनाच्या संकटकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांना घरूनच वंदन केले त्याबद्दल त्यांचे आभार. पोलीस, डॉक्टर, परिचारिका, प्रशासन हे कोरोना संकटात अहोरात्र काम करत आहेत. त्याची आपण सेवा करायची आहे. तरच छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श निर्माण होऊ शकेल, आशा भावना आमदार अनिल बेनके यांनी व्यक्त केल्या.

‘जय शिवाजी, जय जिजाऊ’चा अखंड जयघोष… प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा उत्साह.. अशा भारावलेल्या वातावरणात शिवराज्याभिषेक उत्सव मंडळाचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले की, प्रति वर्षी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर युवराज श्री. संभाजीराजे कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात हजारोंच्या संख्येने साजरा केला जातो. पण यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे किल्ले रायगडावर न जाता बेळगाव मध्येच छत्रपती शिवाजी उद्यानातच शिवभक्तांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.

सकाळी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा साधेपणाने मात्र उत्साहाने साजरा झाला. मात्र, यंदा करोनामुळे दरवर्षी सारखा जोश नव्हता आणि गगनभेदी घोषणाही घुमल्या नाहीत.

6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. यानिमित्ताने दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो. शिवजयंती चित्ररथ महामंडळ बेळगाव व शिवराज्याभिषेक उसत्व मंडळ बेळगावच्या वतीने दरवर्षी छत्रपती शिवाजी उद्यानात हा सोहळा संपन्न होतो. या निमित्ताने बेळगावातील शिवभक्त छत्रपती शिवाजी उद्यानात मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

यावेळी शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव, सरचिटणीस जे. बी. शाहपूरकर, संजय नाईक, रवी निर्मळकर, प्रल्हाद गावडे, विनायक शेट्टी, पवन रायकर, प्रसाद चिकोर्डे, अजय सुगने, उमेश ताशीलदार, रोहित मोरे, मारुती पाटील, इतर शिवभक्त उपस्थित होते. शेवटी शिवरायांच्या ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *