संकेश्वर (वार्ता) : प्रभाग क्रमांक 16 मध्ये साधे गटार स्वच्छतेचे काम होत नसल्याने वैतागलेले राजू बांबरे यांनी मुख्याधिकारी जगदीश ईटी यांना नेते मंडळींच्या उपस्थितीत चांगलेच धारेवर धरले. संतापलेले राजू बांबरे यांनी ईटी यांना एकवचनात सज्जड दम दिल्याने राजकीय वर्तुळात तो चांगलाच चर्चेचा विषय बनलेला दिसत आहे. माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमर नलवडे यांनी मध्यस्थी करून राजू बांबरे यांची समजूत काढली. संतापलेल्या बांबरे यांनी ईटी यांच्या मनमानी कारभाराचा पर्दाफाश केला आहे.
यावेळी बांबरे म्हणाले, ईटीच लय झालं. सर्वच कामात तो दुजाभाव करीत आहे. प्रभागातील साधं गटार स्वच्छतेचे काम नगरसेविका सौ. श्रीविद्या बांबरे यांनी सांगितले तरी केले जात नाही. त्याकरिता नगरसेविका पदाचा राजीनामा दिलेला बरा. प्रभागातील गटारीचे, टॉयलेटच पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. लोक आमच्या नावाने शिमगा करीत आहेत. याचे सोयरसुतक ईटीला नाही. संतापलेल्या राजू बांबरे यांची तक्रार ऐकून घेऊन युवानेते पवन कत्ती यांनी मुख्याधिकारी जगदीश ईटी यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.
यावेळी रोहन नेसरी, नंदू मुडशी, महेश सुगते उपस्थित होते.
