संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर तसेच ग्रामीण भागात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी पोलिसांची रितसर परवानगी घेणे आवश्यक असल्याचे संकेश्वर पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी सांगितले. ते आज संकेश्वर पोलिस ठाण्यात पार पडलेल्या शांतता कमिटीच्या सभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करावी लागली आहे. यंदा जयंती साजरी करतांना आयोजकांनी शांतातेचे भान ठेवायला हवे. कोणीही पोलिसांच्या रितसर परवानगी शिवाय जयंती उत्सव साजरा करता कामा नये असे सांगितले. सभेचे अध्यक्षस्थान नगरसेवक जितेंद्र मरडी यांनी भूषविले होते. उपस्थितांचे स्वागत पोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी केले.
जयंती साजरी करु द्यावी…
काॅंग्रेसचे नेते दिलीप होसमनी म्हणाले, कोरोनामुळे गेली दोन वर्षे झाली घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साही वातावरणात साजरी करता आलेली नाही. पुढच्या वर्षी राज्यातील विधानसभा निवडणूक होत आहेत. निवडणूक आचारसंहितामुळे कदाचित जयंती साजरी करण्यास परवानगी मिळेल की नाही सांगता येत नाही. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी यंदा सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यास परवानगी देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना नगरसेवक ॲड. प्रमोद होसमनी म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साही वातावरणात निश्चितच साजरी केली जाणार आहे. डाॅ. आंबेडकर जयंती आयोजकांचे आणि समाज बांधवांचे सर्वोतोपरी सहकार्य पोलिसांनी निश्चितच राहणार आहे. पोलिसांनी देखील उत्सवात फारशी बंधने लादण्याचे कार्य करु नये. सभेला दलित नेते प्रकाश मैलाके, नगरसेवक गंगाराम भूसगोळ, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश इटेकर, प्रदीप कामानी, आकाश केरीमनी, सदाशिव जाडर, श्रीनिवास व्यापारी, डॉ. आंबेडकर उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.