Wednesday , October 16 2024
Breaking News

संकेश्वरात भरदिवसा विधवेची गोळ्या झाडून हत्या

Spread the love

पैशाच्या देण्या-घेण्याच्या व्यवहारातून हत्या झाल्याचा संशय
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज सकाळी 6 वाजता अज्ञात हल्लेखोरांनी सधन विधवा महिलेची गोळ्या झाडून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याविषयी घटनास्थळावरुन आणि नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी संकेश्वर मड्डी गल्ली कमतनूर वेस नजिक राहत असलेल्या श्रीमती शैलजा ऊर्फ गौरव्वा सुभेदार गौंडती (वय 55) यांच्या घरी आज सकाळी 5.45 वाजता अज्ञात हल्लेखोरांनी प्रवेश केला. गौरव्वा यांच्या छातीवर, मनगटावर धडाधड बंदुकीच्या गोळ्या झाडून हत्या केली आहे. हत्येसाठी आरोपींनी कोणत्या बंदुकीचा वापर केला, हत्येसाठी वापरण्यात आलेली रिव्हाल्वर होती की देसी कट्टा होता. यांची माहिती मिळू शकलेली नाही. हल्लेखोरांनी गौरव्वा यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. गौरव्वा यांच्या छातीच्या डाव्या बाजूला बंदुकीची पहिली गोळी लागली असून दुसरी गोळी हाताच्या मनगटावर झाडली गेली आहे. हल्लेखोरांच्या झटापटीत बंदुकीची तिसरी गोळी निसटल्याने ती घराच्या आत पोलीसांच्या हाती लागली आहे. संकेश्वरात गौडतीचा मर्डर झाल्याची बातमी वार्‍यासारखी पसरल्याने घटनास्थळी लोकांची तोबा गर्दी दिसून आली.
घटनास्थळी लोकांतून गौडतीचा मर्डर कोणी केला? कशासाठी केला? हल्लेखोर कोठून आले होते? मर्डर कशासाठी करण्यात आला. असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात होते. लोकांच्या प्रश्नातून मर्डरची केस गावभर चर्चेचा विषय बनलेली दिसली.
घटनेची माहिती मिळताच बेळगांव जिल्हा सहाय्यक पोलीस प्रमुख महानिंग नंदगांवी, चिकोडी डीएसपी मनोजकुमार नाईक, हुक्केरी पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ, संकेश्वर पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन तब्बल साडेतीन तास कसून चौकशीचे कार्य केले आहे. पोलिस अधिकार्‍यांनी मर्डरचा तपास जलदगतीने करण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करून हल्लेखोरांचा ठावठिकाणा शोधून काढण्याचा प्रयत्न केला. श्वान पूजा गौरव्वा यांच्या घरापासून धावत जाऊन संकेश्वर बसस्टँड येथे घुटमळले. त्यामुळे हल्लेखोर बसस्टँड येथून वाहनाने फरार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पोलिसांनी ठसे तज्ञांना पाचारण करुन बरीच माहिती संग्रहित केली आहे. त्याचबरोबर मड्डी गल्ली आणि कमतनूर वेस येथील दुकानांवरील सीसीटीव्हीचे फुटेज मिळवून हल्लेखोरांचा शोध चालविला आहे. गोळीबारात ठार झालेल्या गौरव्वा सुभेदार यांच्या पत्नीचे कांहीं वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले आहे. त्यांना मुलबाळ नाही. नातेवाईक आहेत.
आजीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून अश्रू अनावर झाले
गौरव्वा यांचे नातू शंकरगौडा पाटील म्हणाले आज सकाळी मामांचा फोन आला. मामांनी आजी घराचं दार उघडत नसल्याचे सांगितले. त्यामुळे मी वेळ न घालविता संकेश्वर गाठलं. घराचे दार जोराने धक्का मारुन उघडले. आत जाऊन पाहिले तर आजी रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्या होत्या. हा घातपाताचा प्रकार असल्याने आम्ही प्रथम पोलिसांना झाला प्रकार सांगितला. गेली 25 वर्षे झाली आजी सासरकडून जमीनीचा वाटा आणि पैशाच्या देण्याचे त्यांच्या व्यवहारात गुरफटून गेल्या होत्या. पैशाच्या देण्या-घेणेच्या व्यवहारातून त्याची हत्या झाली असावी असे वाटते. पोलिस कसून चौकशी करताहेत. आजीच्या संघर्षमय जीवनाचा अंत हत्येने व्हावा. ही गोष्ट मनाला पटेनासी झाली आहे. आजीला न्याय मिळवून देण्याचे काम आंम्ही करणार आहोत.
तुम्ही दार उघडून बाहेर येऊ नका….
गौरव्वा यांचे दोघे नातेवाईक लगतच्या दुकानात झोपले होते. त्यांना गौरव्वा यांनी सकाळी ठिक 5.30 वाजता कॉल करुन तुम्ही दार उघडू नका. पैशाचा व्यवहार संपविण्यासाठी लोक येत आहेत. तुम्हाला त्यांनी पाहिले तर व्यवहार मोडेल. असे सांगितल्याचे डोनवाडचे शिवप्पा शिवापूरे यांनी सांगितले. ते म्हणाले, गौरव्वाने कॉल करुन सांगितल्याने आम्ही दुकानातच बसून राहिलो. तास दिड तास झाले तरी गौरव्वा परत कॉल करेना म्हणून आम्ही घराचं दार उघडून आत प्रवेश केला. गौरव्वा रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसताच आम्ही प्रथम संकेश्वर पोलिसांना घटनेची माहिती दिली. हल्लेखोरांनी गौरव्वावर बंदुकीच्या तीन गोळ्या झाडल्या आहेत. पैकी तिसरी गोळी निसटली आहे. ती पोलिसांच्या हाती लागली आहे. गौरव्वा यांनी दिलेले 50 लाख रुपये बुडविण्यासाठी हत्या केली गेली असावी असे वाटते.
ताईच्या धैर्याने घात केला
संगिता पाटील म्हणाल्या, ताईच्या धैर्याने घात केला आहे. ती धैर्यवान होती. यामुळेच ती नवर्‍याच्या निधनानंतर आपल्या न्यायहक्कासाठी झगडत राहिली आहे. तिला नवर्‍याची हक्काची मालमत्ता मिळविण्यासाठी कोर्टकचेरी करावी लागली होती. तिची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. तिची हत्या पैशाच्या व्यवहारातून झालेली असावी असे वाटते.
पोलिसांनी गौरव्वा यांची हत्या करणार्‍या आरोपींना अटक करुन त्यांना कडक शिक्षा करावी, असे त्यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप

Spread the love  दड्डी : सलामवाडी ता. हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित घटप्रभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *