आरोपी लवकरच गजाआड होतील : पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर मड्डी गल्ली कमतनूर वेस येथे रविवारी सकाळी ५.४५ वाजता अज्ञात हल्लेखोरांनी विधवा महिला शैलजा उर्फ गौरव्वा निरंजन सुभेदार (वय ५५) यांच्या पाठीवर गोळ्या झाडल्याचे तपासाअंती स्पष्ट झाल्याची माहिती बेळगांव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
संकेश्वर पोलीस ठाण्यात ते पत्रकारांशी बोलताना गौरव्वा हत्येचा संक्षिप्त उलगडा केला. यावेळी हुक्केरी पोलिस निरीक्षक रमेश छायागोळ, संकेश्वर पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी उपस्थित होते. जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी आज घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर त्यांनी घटनेची सविस्तर माहिती घेऊन पोलिस अधिकारींना मार्गदर्शन केले आहे.
पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, गौरव्वा राहत असलेले घर मोडकळीस आले आहे. त्यामुळे तिच्या व्याजाने पैसे देण्या-घेण्याच्या व्यवहाराची कसून चौकशी केली जात आहे. हल्लेखोरांनी गौरव्वाच्या पाठीवर तीन गोळ्या झाडल्या आहेत. पहिली गोळी पाठीतून छातीत आरपार झाली आहे. दुसरी आणि तिसरी गोळी पाठीत आणि मनगटावर घायाळ करणारे ठरली आहे. पोलिसांच्या हाती जीवंत गोळी सापडलेली नाही. गोळीचे कॅप हाती लागले आहे. हल्लेखोर किती जण होते, त्यांनी हत्येसाठी रिव्हाल्वर वापरली की, देसी कट्टा (गावठी पिस्तूल) वापरली याविषयी माहिती देण्यास त्यांनी नकार दर्शविला. संकेश्वरात प्रथमच शूटाऊटचा प्रकार घडला आहे हल्लेखोरांनी रिव्हाल्वरचा वापर केला असता तर शूट करताना मोठा आवाज झाला असता पण तसा आवाज कोणी झाल्याची माहिती नाही. त्यामुळे हत्येसाठी कदाचित देसीकट्टा वापरला गेलेला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. हल्लेखोरांचा लवकरात लवकर तपास लागावा याकरिता घटनास्थळी श्वान पथकाला बोलावून हल्लेखोरांचा शोध घेणेचे कार्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर ठसे तज्ञांनी बरीच माहिती संग्रहित केली आहे. सर्व साक्ष आरोपींच्या शोध कार्यात निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत. हत्या झालेल्या गौरव्वाची स्थावर मालमत्ता किती आहे. त्यांनी कोण-कोणत्या बँकेत ठेव स्वरुपात पैसे गुंतविले आहेत. ती व्याजाने पैसे देण्याचा व्यवहार करीत होती काय? याविषयीची माहिती मिळविण्याचे कार्य केले जात आहे. गौरव्वाच्या शवविच्छेदनातून हत्येसाठी कोणती बंदूक वापरण्यात आली. याची माहिती मिळणार आहे. आरोपींना गजाआड करण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. लवकरच हल्लेखोर गजाआड होतील असे त्यांनी सांगितले.
भ्याड हल्लेखोर
गौरव्वाची हत्या पाठीवर गोळ्या झाडून करणारे हल्लेखोर भ्याड असल्याची चर्चा केली जात आहे. गौरव्वा ही हल्लेखोरांना पुरुन उरणारी होती. त्यामुळे हल्लेखोरांनी पाठीमागून वार केल्याची चर्चा होताना दिसत आहे.
विकतचे दुखणे घेतले
गौरव्वाच्या हत्येनंतर गावभर एकच चर्चा होताना दिसत आहे. गौरव्वाचा स्वभाव मुळात भांडखोर होता. त्यामुळे तिने विकतचे दुखणे (अनेकांशी वैरत्व) निर्माण करुन घेतले होते. गौरव्वा धैर्यवान होती पण हाच स्वभाव तिला अंगलट आल्याचे देखील सांगितले जात आहे.