संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात आज सुवासिनी स्त्रियांनी वटपौर्णिमा उत्साही वातावरणात साजरी केली. वडाचे वृक्ष असलेल्या ठिकाणी सुवासिनी स्त्रियांनी पूजेसाठी एकच गर्दी केलेली पहावयास मिळाली. सुवासिनी महिलांनी सौभाग्यवृध्दीसाठी वडाच्या मुळांना पाणी अर्पण करुन वडाच्या झाडाच्या प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टण करीत पूजाअर्चा करतानाचे चित्र पहावयास मिळाले. वटपौर्णिमा भक्तीभावाने साजरी करतांना सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे. पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना करताना सातो जन्मी हाच पतीपरमेश्वर मिळावा अशीही प्रार्थना केली. वटसावित्री पूजेनंतर सुवासिनी महिलांनी सौभाग्यवायने देण्याची प्रथाही कायम केली. येथील श्री शंकराचार्य संस्थान मठात तसेच हुद्दार वाडा येथील वटवृक्षाच्या पूजेसाठी महिलांनी गर्दी केलेली पहावयास मिळाली.
