सिने स्टाईलने घरातील लोकांचे हात-पाय बांधून चोरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावरील किल्लेदार मळ्यात सोमवारी रात्री ८.१५ वाजता अज्ञात ८ ते १० चोरांनी शशीकांत सातलिंग किल्लेदार आणि राम किल्लेदार यांच्या घरावर फिल्मी स्टाईलने घरातील शशीकांत सातलिंग किल्लेदार, वृध्दा शकुंतला सातलिंग किल्लेदार यांचे हातपाय बांधून, प्लास्टीक पट्टीने तोंड बंद करुन चाकूचा धाक दाखवित धाडसी दरोडा घालून घरातील १४० ग्रॅम सोन्याचे अलंकार, रोख ७५ हजार रुपये असे ७.५० हजार रुपयांची चोरी करुन चोरटे फरार झाले आहेत. संकेश्वर पोलीस सूत्रांकडून आणि किल्लेदार परिवारातील सदस्यांकडून धाडसी दरोड्याची मिळालेली माहिती अशी संकेश्वर-गडहिंग्लज रस्त्यावरील किल्लेदार मळ्यात सोमवारी रात्री ८.१५ वाजता अज्ञात आठ ते दहा चोर दाखल झाले. त्यानी प्रथम घरातील वृध्दा श्रीमती शकुंतला सातलिंग किल्लेदार यांचे हातपाय दोरीने बांधले. आरडाओरड करताच शकुंतला यांचे प्लास्टीक पट्टीने तोंड बंद केले. शांत बसण्यासाठी त्यांच्या गालावर रपाटा लावला. तदनंतर चोरांनी शशीकांत सातलिंग किल्लेदार यांचे हातपाय बांधून, तोंड बंद करून प्लास्टीक बुट्टीने त्यांच्या कपाळावर वार केला. यात ते बेशुद्ध पडले. चोरांनी प्रथम शशीकांत यांचे घर लक्ष केले. घरात प्रवेश करुन तिजोरी फोडून त्यातील सोन्याचे १२० ग्रॅम अलंकार, रोख ७५ हजार रुपये घेऊन राम किल्लेदार यांच्या बंद घराचा कडीकोंयडा तोडून आत प्रवेश केला. चोरांनी येथील तिजोरी फोडून ४० ग्रॅम वजनाचे अलंकार चिल्लर पैसे घेऊन बाहेरुन वाहनांचा आवाज येताच पोबारा केला आहे.
चूप बस्स
शकुंतला सातलिंग किल्लेदार चोरीच्या घटनेविषयी सांगताना म्हणाल्या तोंडाला कापड गुंडाळलेले तिघे चोर माझ्याकडे आले. मी टीव्हीवरील धारवाही बघत बसले होते. चोरांनी माझे हातपाय बांधले. मी आरडाओरड करताच त्यांनी माझे तोंड प्लास्टीक पट्टीने बंद केले तरी मी प्रतिकार करताच त्यानी माझ्या गालावर रपाटा लावला. माझ्या तोंडातून रक्त वाहू लागल्याने मी चूप बसले. चोर कन्नड भाषेतून बोलत होते. चोरांनी माझ्या गळ्यातील सोन्याचे बोरमाळ हिसकावून काढून घेतले. घरातील तिजोरी फोडून १२ तोळे सोन्याचे अलंकार, रोख लाख रुपये घेऊन पोबारा केला आहे.
कपाळावर जोराने वार केला
शशीकांत सातलिंग किल्लेदार चोरीच्या घटनेविषयी सांगताना म्हणाले मी दूध डेअरीत दूध घालून घरात प्रवेश करताच मला पाच अज्ञात चोरांनी घट्ट पकडले. माझे हातपाय बांधून प्लास्टीक पट्टीने तोंड बंद केले. मी प्रतिकार करु लागल्याने चोरांनी माझ्या कपाळावर प्लास्टीक बुट्टीने जोराने वार केला.त्यात मी बेशुद्ध झालो. राम यांच्या घरात चोरी करताना आवाजाने मी शुध्दीत आलो पण तोपर्यंत चोरांनी दरोडा घातला होता.
घरात कोणी नव्हत
राम किल्लेदार म्हणाले, आमच्या घरात कोणी नव्हत. मी औषध दुकानात होतो. आमच्या घरांचा कडीकोयंडा तोडून चोरांनी घरातील तिजोरी फोडून मुलीचे सोन्याचे चेन, कर्णफूले, दोन लेडीज टायटन रिस्टवाॅच, चिल्लर पैसे घेऊन पोबारा केला आहे. आमच्या घरातुन ४० ग्रॅम सोन्याचे अलंकार चोरले गेले आहेत. चोरांनी टायटन रिस्टवाॅच चोरताना जुनी वाॅच सोडून दिली आहे. तिजोरीतील एक लाख रुपये चोरांच्या नजरेला पडलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.
घटनास्थळी श्वान पथक, ठसे तज्ञ
बेळगांव जिल्हा सहाय्यक पोलीस प्रमुख महानिंग नंदगांवी यांनी घटनास्थळी भेट देऊन श्वान पथकाला पाचारण केले. श्वान किल्लेदार यांचे घरापासून चोरांचा मागोवा घेत संकेश्वर-गडहिंग्लज मार्गावर घुटमळले आहे. संकेश्वर पोलीस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी सरपोलीस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी चोरीच्या घटनेची नोंद करुन घेऊन चोरांचा शोध घेताहेत. संकेश्वर पोलिसांत चोरीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.