नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं एका मोठ्या आणि दमदार विजयाची नोंद केली आहे. भारतानं सामना 1 डाव आणि 132 धावांच्या फरकानं जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. सामन्यात सुरुवातीपासून भारतानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. ज्यात ऑस्ट्रेलियाला 177 धावांत सर्वबाद करुन भारतानं पहिल्या डावात 400 धावा करत 223 धावांची आघाडी घेतली. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 91 धावांत आटोपत सामना 1 डाव आणि 132 धावांनी जिंकला आहे. भारताकडून रवींद्र जाडेजाने दोन्ही डावात मिळून 7 तर अश्विननं दोन्ही डावांत मिळून 8 विकेट्स घेतल्या. याशिवाय कॅप्टन रोहित शर्माने 120 तर अक्षर पटेल 84 आणि रवींद्र जाडेजा 70 यांनी सर्वाधिक धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा युवा फिरकीपटू टॉड मर्फीने एका डावातच 7 विकेट्स घेत चांगली कामगिरी केली पण अखेर सामना भारतानं मोठ्या फरकाने जिंकला आहे.
सामन्यात सर्वात आधी नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने फलंदाजी निवडली. एक मोठी धावसंख्या उभारण्याचा त्यांचा प्लॅन होता. पण भारताची स्टार फिरकीपटू जोडी जाडेजा आणि अश्विन यांनी अप्रतिम गोलंदाजी करत मिळून एकूण 8 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 177 धावांत सर्वबाद केलं. यावेळी सर्वोत्तम गोलंदाजी रवींद्र जाडेजाने केली. त्याने 22 ओव्हरमध्ये 47 रन देत एकूण पाच गडी बाद केले. दुसरीकडे अश्विनने तीन विकेट घेतल्या. तर सिराज आणि शमीने प्रत्येकी एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून यावेळी अलेक्स कॅरी याने 37 तर लाबुशेनने 49 धावांची सर्वाधिक खेळी केली. अश्विन-जाडेजाशिवाय शमी आणि सिराजनं एक-एक विकेट घेतली.
रोहितचं शतक भारताची आघाडी
177 धावांवर ऑस्ट्रेलियाचा डाव आटोपल्यावर भारताकडून फलंदाजीला आलेल्या कॅप्टन रोहित शर्माने सुरुवातीपासूनच तुफान फटकेबाजी सुरु केली. आल्याआल्या चौकार मारण्यास त्यानं सुरुवात केली. ज्यामुळे पहिला दिवस संपताना भारतानं 77 धावांपर्यंत मजल मारली. केएल राहुल 20 धावा करुन बाद झाला होता तर रोहित नाबाद 56 धावांवर क्रिजवर होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अश्विन, विराट, केएस भरत, सूर्यकुमार, पुजारा हे सर्वजण स्वस्तात माघारी परतले. रोहितनं 120 धावा करत दमदार शतक ठोकलं. त्यानंतर जाडेजा आणि अक्षर यांनी एक दमदार भागिदारी उभारली पण तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातच जाडेजा 70 धावा करुन बाद झाला. मग शमीने 37 धावांची खेळी केली. ज्यानंतर अखेर अक्षर 84 धावा करुन बाद झाल्यावर 400 धावांवर भारताचा डाव आटोपला.
अश्विनचा पंजा, ऑस्ट्रेलिया घायाळ
223 धावांची पिछाडी घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला सुरुवातीपासूनच भारतानं धक्के देण्यास सुरुवात केली. स्टार फिरकीपटू आर अश्विनने तब्बल 5 ऑस्ट्रेलियन फलंदाजांना तंबूत धाडलं. त्याच्या मदतीला जाडेजानंही कमाल गोलंदाजी केली. त्यानंही महत्त्वाचे दोन विकेट्स घेतले. याशिवाय शमीनं दोन आणि अक्षरनं एक विकेट घेत ऑस्ट्रेलियाला 91 धावांवर सर्वबाद करत सामना एक डाव आणि 132 धावांनी भारताला जिंकवून दिला. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथ अखेरपर्यंत क्रिजवर 25 धावांवर नाबाद राहिला पण त्याला कोणाचीच साथ न मिळाल्याने सामना ऑस्ट्रेलियाने गमावला. या विजयासह भारतानं चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली असून आता दुसरा सामना 17 फेब्रुवारीपासून दिल्लीमध्ये खेळवला जाणार आहे.