Wednesday , May 29 2024
Breaking News

जोस बटलरचे तडाखेबंद शतक; राजस्थानने केली विक्रमी पाठलागाची बरोबरी

Spread the love

 

जोस बटलरच्या शतकी कामगिरीच्या जोरावर राजस्थानने केकेआरचा २ विकेट्सने पराभव केला. कोलकाताने दिलेल्या २२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एकटा जॉस बटलर कोलकाता संघावर भारी पडला. राजस्थानने २२४ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत पंजाब किंग्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. २२० च्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्सने ६ बाद २२० धावांचा यशस्वी पाठलाग केला. तर आजच्या सामन्यात राजस्थानने ८ बाद २२४ धावांचा यशस्वी पाठलाग करत या विक्रमाशी बरोबरी साधली.

अशक्य वाटणारा विजय अखेरपर्यंत नाबाद राहत बटलरने राजस्थानला मिळवून दिला आहे. बटलरने ६० चेंडूत ६ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १०७ धावा करत संघाला विजय मिळवून देत नाबाद परतला. जोस बटलरचे हे आयपीएलमधील सातवे शतक आहे. आयपीएलमधील सर्वाधिक शतकांच्या यादीत बटलर दुसऱ्या स्थानी आहे, तर विराट ८ शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. रोव्हमन पॉवेल अखेरच्या षटकांत येऊन ३ षटकार लगावले ज्यामुळे बटरलला ही मोठी धावसंख्या गाठण्यास मदत झाली. रोव्हमन पॉवेलने बाद होण्यापूर्वी १३ चेंडूत ३ षटकार आणि १ चौकारासह २६ धावांची शानदार खेळी केली.

राजस्थान संघाची फलंदाजीची सुरूवात फारशी चांगली झाली नाही. चांगल्या लयीत दिसत असलेला जैस्वाल १९ धावा करत बाद झाला. तर संजू सॅमसनही आज मोठी खेळी करू शकला नाही आणि १२ धावा करत बाद झाला. रियान परागने बटलरसोबत चांगली भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. तो ३४ धावा करत हर्षित राणाच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर ध्रुव जुरेल (२), अश्विन (८) झटपट बाद झाले. तर शिमरॉन हेटमारला चक्रवर्तीने गोल्डन डकवर बाद करत राजस्थानला मोठा धक्का दिला. त्यानंतर आलेल्या रोव्हमन पॉवेलने एक शानदार खेळी केली आणि बटलरवरील धावांचे ओझे कमी केले. तर ट्रेंट बोल्ट बटलरला स्ट्राईक देताना धावबाद झाला. पण त्यानंतर बटलरने तुफान फटकेबाजी करत आपले शतकही झळकावले आणि संघाला मोठा विजय मिळवून दिला.

केकेआरकडून हर्षित राणा, सुनील नरेन आणि वरूण चक्रवर्ती प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर वैभव अरोराच्या खात्यात एक विकेट आहे. मिचेल स्टार्क या सामन्यातही चांगलाच महागडा ठरला. स्टार्कने ४ षटकांत सर्वाधिक ५० धावा दिल्या.

तत्पूर्वी राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने ६ बाद २२३ धावा केल्या. केकेआरकडून सलामीवीर सुनील नरेनने पहिले आयपीएल शतक झळकावत ५६ चेंडूत १३ चौकार आणि ६ षटकारांसह १०९ धावा केल्या आहेत. अंगक्रिश रघुवंशीने (३०) नरेनसोबत चांगली भागीदारी संघासाठी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. बोल्टने नरेनला क्लीन बोल्ड करत बाद तर केले पण यॉर्कर टाकत त्याने स्टंपही तोडला. याशिवाय सर्व फलंदाज ३० धावांच्या आधीच बाद झाले. फिल सॉल्टला एकदा जीवदान मिळाले, पण तो मोठी खेळी करू शकला नाही. १० धावा करत आवेश खानच्या शानदार झेलवर तो बाद झाला. श्रेयस अय्यर ११ धावा करत चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर रसेल (१३) आणि रिंकू सिंग (२०) झटपट धावा करत बाद झाले. पण नरेन संघाला चांगली सुरूवात करून दिल्याने संघाने २०० धावांचा टप्पा सहज गाठला.

राजस्थानकडून कुलदीप सेन आणि आवेश खानने प्रत्येकी दोन विकेट घेतले. तर चहल आणि बोल्टने प्रत्येकी एक विकेट घेतली.

About Belgaum Varta

Check Also

हैदराबादला 8 गड्यांनी नमवत कोलकाता फायनलमध्ये

Spread the love  गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *