Wednesday , May 29 2024
Breaking News

गुजरात रायटन्स चॅम्पियन!

Spread the love

अहमदाबाद : कर्णधार हार्दिक पंड्याच्या चतुरस्र खेळाच्या जोरावर आपला पहिलाच हंगाम खेळणार्‍या गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 चे विजेतेपद पटकावले. येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सला 7 गड्यांनी हरवले. कर्णधार हार्दिक पंड्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने गोलंदाजीत 3 गडी बाद तर फलंदाजीत 34 धावा जोडल्या. त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 130 धावा केल्या. गुजरात टायटन्सने हे आव्हान 18.1 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यामुळे आयपीएलचा पहिला विजेता असलेल्या राजस्थानचे 14 वर्षांनंतर विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न भंगले.
राजस्थानने दिलेले 130 धावांचे लक्ष्य सोपे दिसत होते; परंतु राजस्थानने गुजरातला सुरुवातीपासूनच धक्के देण्यास सुरुवात केली. पहिल्या षटकांत चौथ्या चेंडूवर शुभमन गिलला युजवेंद्र चहलने झेल सोडून जीवदान दिले; पण पुढच्या षटकांत प्रसिद्ध कृष्णाने वृद्धिमान साहाचा (5) त्रिफळा उडवला. त्याच्या जागी आलेल्या मॅथ्यू वेडने एक षटकार ठोकला; परंतु बोल्टने त्याला परागकडे झेल देण्यास भाग पाडले. पॉवर प्लेमध्ये गुजरातला 2 विकेटच्या बदल्यात फक्त 31 धावाच करता आल्या.
यानंतर सलामीवीर शुभमन गिल आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांनी खेळपट्टीचे स्वरूप ओळखून संयमी फलंदाजी करीत धावा जमवण्यास सुरुवात केली. दोघांनी 43 चेंडूंत 50 धावांची भागीदारी केली. ही जमलेली जोडी युजवेंद्र चहलने फोडताना पर्पल कॅप आपल्या डोक्यावर परत मिळवली. यानंतर गिलने मिलरच्या साथीने धावफलक हालता ठेवला आणि विजयी लक्ष्य जवळ आणले. 19 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर शुभमन गिलने ओबेड मकॉयला षटकार ठोकून विजेतेपदावर गुजरातचे नाव कोरले. गिल (45) आणि मिलर (32) हे नाबाद राहिले.
तत्पूर्वी, संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल व जोस बटलर यांनी सावध सुरुवातीवर भर दिला. चौथ्या षटकात यशस्वी (22) झेलबाद झाला. 9 व्या षटकात हार्दिक पंड्याने गुजरातला मोठी विकेट मिळवून दिली. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन 14 धावा करून माघारी परतला. हार्दिकने त्या षटकात 1 धाव देत 1 गडी बाद केला. इथून पुढे गुजरातने सामन्यावरील पकड आवळण्यास सुरुवात केली.
आयपीएल फायनलमध्ये आतापर्यंत फक्त कर्णधार अनिल कुंबळेला गडी बाद करता आला होता. आज हार्दिक पंड्याने त्या पंक्तीत स्थान पटकावले. राजस्थानवर दडपण निर्माण करण्यासाठी हार्दिकने चेंडू पुन्हा शमीकडे दिला; परंतु बटलरने त्या षटकात 11 धावा चोपून आणखी एक विक्रम नावावर केला.
12 व्या षटकात राशिद खानने राजस्थानच्या देवदत्त पडिक्कलला (2) बाद केले आणि पुढच्याच षटकात हार्दिकने महत्त्वाचा गडी बाद केला. जोस बटलर 35 चेंडूंत 5 चौकारांच्या मदतीने 39 धावांवर बाद झाला. त्यानंतर राजस्थानच्या अन्य फलंदाजांना बाद करण्यात गुजरातला फार कष्ट घ्यावे लागले नाही. हार्दिकने त्याच्या चौथ्या षटकात शिमरोन हेटमायरला (11) बाद केले. त्यानंतर साई किशोरने आर. अश्विन (6) व ट्रेंट बोल्ट (11) यांना माघारी पाठवले. राजस्थानला 9 बाद 130 धावा करता आल्या.

जोस बटलरने वॉर्नरला पछाडले, पण विराट कोहलीचा विक्रम दूरच

आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या नावावर आहेत. त्याने 2016 साली 973 धावा केल्या होत्या. त्यानंतर या यादीत दुसर्‍या स्थानावर होता तो डेव्हिड वॉर्नर. ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरने एका हंगामात 824 धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्यामुळे या सामन्यात जोसने 10व्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर दोन धावा काढल्या आणि 25 धावा पूर्ण करत वॉर्नरचा विक्रम मोडीत काढला. त्याचबरोबर आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही जोसने आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी हा विक्रम वॉर्नरच्या नावावर होता, त्याने एका हंगामात प्ले ऑफमध्ये 190 धावा केल्या होत्या. बटलरने यावेळी प्ले ऑफमध्ये 200पेक्षा जास्त धावा केल्या.

About Belgaum Varta

Check Also

हैदराबादला 8 गड्यांनी नमवत कोलकाता फायनलमध्ये

Spread the love  गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *