Saturday , July 27 2024
Breaking News

भारत पाचव्यांदा अंडर-19चा विश्वविजेता!

Spread the love

अंतिम सामन्यात इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव

अँटिग्वा : भारतीय संघाच्या १९ वर्षाखालील संघाने पाचव्यांदा विश्वचषक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. भारताने इंग्लंडने दिलेल्या १९० धावांचा आव्हानांचा सहा गडी गमावत यशस्वी पाठलाग केला. या विजयात निशांत सिंधु ५० (५४ चेंडू), शेख रशिद ५० (८४ चेंडू), राज बावा ३५ (५४चेंडू) यांनी बहुमोल कामगिरी बजावली. सर्वच खेळाडुंच्या योगदानाच्या जोरावर या तरुण तुर्क भारतीय संघाने पाचव्यांदा विश्वविजयी होण्याचा बहुमान मिळवला.
इंग्लंडच्या आव्हानाचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी हा शुन्यावर बाद झाला. त्यानंतर सलामीवीर हरनूर सिंह आणि शेख रशिद यांनी संघाला सावध सुरुवात दिली. त्यांनी संयमी फलंदाजीचा नमुना इंग्लंडसमोर पेश करत एकेरी आणि दुहेरीवर धावा घेत धावफलक हालता ठेवला. भारतीय संघाचा जम बसत असताना चांगला खेळत असणारा हरनूर सिंह २१ (४६ चेंडू) धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार यश धुलला सोबत घेत शेख रशिद याने धावसंख्या वाढविण्यास प्रारंभ केला. त्याने अर्धशतकी खेळी केली. पण या अर्धशतकी खेळीचा आनंद फार काळ साजरा करता आला नाही. ५० (८४ चेंडू ) या धावसंख्येवरच रशिदला माघारी परतावे लागले. त्याचा पाठोपाठ कर्णधार यश धुल देखिल १७ (३२ चेंडू) धावा करुन तंबुत परतला.
२९ व्या षटकात भारतीय संघाचे ९७ धावांत ४ फलंदाज बाद झाले होते. संघ पुन्हा एकदा अडचणी सापडला होता अजून निम्मा पल्ला गाठायचा होता. निशांत संधु आणि राज बावा हे संघासाठी धावून आले. यांनी चौफेर फटकेबाजी करत संघाला पुन्हा विजयी पथावर अग्रेसर केले. या दोघांनी ६७ धावांची भागिदारी रचत भारताला विजयासमीप पोहचवले. ४३ व्या षटकात राज बावा ३५ (५४ चेंडू) धावांवर बाद झाला. त्याचा पाठोपाठ कुशल तांबे हा देखिल १ धावसंख्येवर बाद होत माघारी फिरला. पाठोपाठ २ बळी घेत इंग्लंड संघाने पुनरागमन केले होते. पण, खेळपट्टीवर जम बसलेला निशांत सिंधु आणि यष्टीरक्षक फलंदाज दिनेश बाना यांनी इंग्लंडसंघास कोणतीच संधी दिली नाही.
फलंदाज दिनेश बाना याने ४८ व्या षटकातील ३ आणि ४ चेंडूवर सलग दोन उत्तुंग षटकार ठोकत थाटत विजयाला गवसणी घातली. अवघी १ धाव आवश्यक असताना सुद्धा बाना याने षटकार लगावत सामना जिंकला. यावेळी भारताने २०११ साली श्रीलंके विरुद्ध जिंकलेल्या विश्वचषकातील अंतिम सामन्याची आठवण झाली. भारताचा कर्णधार धोनीने षटकार ठोकत विश्वचषक फायनल जिंकला होता. तसेच बाना देखिल षटकार ठोकत अंडर १९ विश्वचषक फायनल जिंकला. योगो योग असा की बाना देखिल यष्टीरक्षकच आहे. बानाने अवघ्या ५ चेंडूत १३ धावांची तुफानी खेळी करत नाबाद राहिला. तर निशांत सिंधु याने देखिल ५० (५४) धावांची अत्यंत बहुमोल कामगिरी बजावत शेवट पर्यंत नाबाद राहिला.
तत्पुर्वी, पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकण्यासाठी भारताला 190 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 44.5 षटकांत 189 धावांवर सर्वबाद झाला. जेम्स रेव्हने सर्वाधिक 95 धावा केल्या. भारताकडून राज बावाने 5 आणि रवी कुमारने 4 बळी घेतले. तर कौशल तांबेला 1 विकेट मिळाली. इंग्लंडच्या संघाने एकवेळ 91 धावांत सात विकेटस् गमावल्या होत्या; पण त्यानंतर रेव्ह आणि जेम्स सेल्स (34) यांनी आठव्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी करत इंग्लंडला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले.
इंग्लंडची सुरुवात खराब झाली आणि दुसर्‍याच षटकात रवी कुमारने जेकब बेथेलला (2) बाद केले. त्याच्या पुढच्याच षटकात रवीने कर्णधार टॉम पर्स्टला (0) क्लीन बोल्ड करून भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्यानंतर जॉर्ज थॉमसला (27) राज बावाने बाद केले. यानंतर पुन्हा राज बावाने भारताला चौथे यश मिळवून दिले. त्याने विल्यम लक्सटनला (4) दिनेश बानाकडे झेल देण्यास भाग पाडले. बावाने पुढच्याच चेंडूवर जॉर्ज बेललाही (0) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दोन षटकांनंतर बावाने रायन अहमदला (10) स्लिपमध्ये झेलबाद करून भारताला सहावे यश मिळवून दिले. त्यानंतर कौशल तांबेने अ‍ॅलेक्स हॉर्टनला (10) कर्णधार यश धूलकरवी झेलबाद केले.
यानंतर जेम्स रेव्ह आणि जेम्स सेल्स यांनी शानदार भागीदारी केली. ही भागीदारी रवी कुमारने 44 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर रेव्हला बाद करून तोडली. त्याच षटकात त्याने थॉमस स्पिनवॉललाही (0) बाद केले. 45 व्या षटकात राज बावाने जोशुआ बाऊडेनला (1) बाद करून इंग्लंडचा डाव 189 धावांत संपुष्टात आणला.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद

Spread the love  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *