Friday , December 8 2023
Breaking News

आमदार बसवराज यत्नाळांना लवकरच मिळणार मंत्रिपद : उमेश कत्ती

Spread the love

 


बेळगाव (वार्ता) : प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नूतन जिल्हा पालकमंत्री उमेश कत्ती यांनी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांना लवकरच मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उमेश कत्ती म्हणाले, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत किंवा बदलाबाबत मंत्रिमंडळात कोणतीही चर्चा होत नाही. हि चर्चा केवळ प्रसारमाध्यमांमध्ये रंगत आहे. विजापूर जिल्ह्यावर अन्याय झाला आहे या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना उमेश कत्ती म्हणाले, आमदार यत्नाळ हे मंत्री होणारच आहेत. यात कोणतेही दुमत नाही. यत्नाळ हे माझे मित्र आहेत. यापूर्वी ते केंद्रीय मंत्री होते. राज्य सरकारमध्ये ते मंत्री व्हावेत. आणि लवकरच त्यांना मंत्रिपद मिळेल असा विश्वास उमेश कत्ती यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी यत्नाळांना मंत्रीपद दिले पाहिजे. यत्नाळांना मंत्रिपद देण्यासाठी आपला संपूर्ण पाठिंबा आहे, असे मत उमेश कत्ती यांनी व्यक्त केले.
सध्या गुप्त बैठक होत आहेत यासंदर्भात बोलताना कत्ती म्हणाले. गुप्त बैठका वगैरे असा काही प्रकार नसून विधानपरिषद निवडणुकीत महांतेश कवटगीमठ यांच्या झालेल्या पराभवाबद्दल चर्चा करण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली होती. आगामी काळात तालुका पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी बैठक बोलाविण्यात आली होती. दहा आमदारांसहित बैठक बोलावून चर्चा करण्यात आली असून हि कोणतीही गुप्त बैठक नसल्याचे उमेश कत्ती यांनी स्पष्ट केले. भाजपमधील काही जण काँग्रेसचे दार ठोठावल्याची चर्चा पुढे येत आहे, याविषयावर उत्तर देताना उमेश कत्ती म्हणाले, यापैकी एखाद दुसरे नाव सांगा. काँग्रेसकडून दररोज हेच बोलले जाते. कोणीही काँग्रेसच्या दरवाजावर गेले नाही. भाजप सोडून काँग्रेसमध्ये कोणी जाणार नाही. अद्याप दीड वर्ष आपली सत्ता आहे, अधिकार आहे. याकाळात योग्य शासन देण्याची हमी देत पुन्हा एकदा भाजपचं अधिकारात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भाजपाला रामराम ठोकलेले काहीजण पुन्हा भाजपच्या मार्गावर असल्यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना कत्ती म्हणाले, कोणीही कुठेही गेले नाही आणि जे एकदा गेलेत त्यांना पुन्हा परत घेण्यात येणार नाही. आम्ही १२० भाजप आमदार आहोत. सरकार चालवत आहोत. योग्य शासन देत आहोत. विकासावर भर देत मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत. आम्हाला देण्यात आलेली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडण्यात येईल, यासाठी आपल्या साऱ्यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे आवाहन उमेश कत्ती यांनी केले. जारकीहोळी बंधू आणि कत्ती बंधू यांच्यात सुरु असलेल्या चढाओढीसंदर्भात बोलताना ते म्हणाले, भाजपमध्ये बंधू असा प्रकार नसून सर्वजण आमदार आहेत. एखादा मोठा भाऊ आहे तर एखादा लहान भाऊ आहे. कोणामध्येही दुमत नसून आगामी निवडणुकीत पुन्हा भाजपाचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास उमेश कत्ती यांनी व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

भ्रूणहत्या प्रकरण : भ्रूणहत्या करून बाळाला फेकले वैद्यकीय कचऱ्यात

Spread the love  परिचारीकेने उघड केली माहिती बंगळूर : महिनाभरात ७० मुलांचे अबॉर्शन केले, आम्ही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *