बेंगळुरू : दिवंगत पुनीत राजकुमार आम्हाला सदैव प्रेरणादायी आहेत. त्यांना ‘कर्नाटक रत्न‘ पुरस्कार देण्याबाबत लवकरच बैठक घेऊन तारीख जाहीर करण्यात येईल असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
बेंगळुरातील आरटी नगरातील निवासस्थानी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, आपले सर्वांचे लाडके अप्पू मेगास्टार पुनीत राजकुमार यांचा आज 47वा जन्मदिन आहे. ते आज असते तर आम्ही अतिशय आनंदात हा दिवस साजरा केला असता. पण ते नसल्याने सगळे दुःखात आहोत. तरीही त्यांचीचे विचार, तत्व, आदर्श जीवन, लोकांशी वागण्याची पद्धत, गरिबांविषयीचा त्यांचा कळकळा, त्यांनी केलेले अवयवदान आम्हाला सतत प्रेरणा देत राहील. लहान वयातच अप्पू सर्व काही करून गेले. त्यांनी केलेल्या कार्याचे आम्ही स्मरण करत आहोत. आज त्यांचा ‘जेम्स’ चित्रपटही प्रदर्शित झालाय. तो यशस्वी व्हावा अशा शुभेच्छा मुख्यमंत्र्यानी दिल्या. दिवंगत पुनीत राजकुमार याना कर्नाटक रत्न पुरस्कार देण्याबाबत त्यांच्या कुटुंबियांसोबत लवकरच बैठक घेऊन चर्चा करून तारीख जाहीर करण्यात येईल. पुनीत आणि डॉ. राजकुमार यांचा मान राखला जाईल अशा पद्धतीने सर्व तयारी करण्यासाठी एका उपसमितीची रचना करून लवकरच अप्पू याना कर्नाटक रत्न पुरस्कार देण्यात येईल असे बोम्मई यांनी सांगितले. दिवंगत अभिनेते पुनीत राजकुमार यांच्याबाबत मुख्यमंत्री बोम्मई यांना असलेले प्रेम आणि आदर सर्वानाच माहित आहे. आता त्यांनी पुनीत याना कर्नाटक रत्न लवकरच देण्याची इच्छा बोलून दाखविल्याने अप्पू यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.
