बेंगळुरू : राज्यात शांतता, विकास आणि सर्वसामान्य जनतेची सुरक्षा यासाठी सरकार प्राधान्य देत असून हिजाब, हलाल प्रकरणांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला पोहोचलेला धक्का, यानंतर सरकार राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. विधानसौध येथे पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भात माहिती देताना ते बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बेंगळूर, तुमकूर, मुद्देनहळ्ळी दौऱ्यावर येणार आहेत. ३१ मार्च रोजी रात्री १० वाजता राज्यात त्यांचे आगमन होणार असून यानंतर विविध ठिकाणी ते भेट देणार आहेत. या दरम्यान अमित शहा तुमकूर येथील सिद्धगंगा मठात डॉ. शिवकुमार महास्वामींच्या ११५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत यानंतर चिक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देबिहाळ येथील नूतन वैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन, यानंतर बेंगळूरमधील अरमने सभागृहातील सहकार संमेलनात नंदिनी क्षीर विकास बँकेच्या लोगोचे अनावरण करणार आहेत. याचप्रमाणे यशस्विनी योजनेच्या लोगोचेही अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. हलाल आणि मांस बंदी संदर्भात अभियान सुरु करण्यात आल्याबाबत अधिक माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात या सर्व गोष्टींना नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीपासूनच काही नियम आणि पद्धती ठरविण्यात आल्या असून आमचे सरकार हे उजव्या किंवा डाव्या विचारसरणीचे नसून सरकार केवळ विकासावर भर देणारे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. साहित्यिकांच्या पात्रांसंदर्भात प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले, यातील तथ्य तपासून वास्तव काय आहे याचा अभ्यास केला जाईल. यावेळी टिपू सुलतान यांच्यावरील अभ्यासक्रम हटविण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया देण्यास मात्र मुख्यमंत्र्यांनी टाळले. एकंदर राज्याची शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून कोणत्याही जातीयवादी विचारसरणीपेक्षा केवळ विकासावर लक्ष केंद्रित करणारे आपले सरकार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
