
बंगळूर : राज्य सरकारच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रक जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आर्थिक विषयातील अज्ञान, प्रशासनाचा अनुभवाचा अभाव आणि राजकीय हताशता याचेच हे लक्षण असल्याची टीका करत त्यांनी या विषयावर खुल्या चर्चेसाठी आपण तयार असल्याचे आव्हान दिले.
मुख्यमंत्री म्हणाले की, “गेल्या महिन्यातच मी चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडला आहे. तो केवळ आकडेवारीचा संच नसून राज्यातील सात कोटी नागरिकांसमोर सादर केलेले प्रामाणिक लेखापरीक्षण आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी तो मंजूर केला आहे. हेच आमचे श्वेतपत्रक आहे.”
स्पष्टीकरण देण्याची तयारी
विधानमंडळात अर्थसंकल्पावर सखोल चर्चा झाली असून विरोधी पक्षातील २१ सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तरे दिल्याचे त्यांनी सांगितले. “अजूनही शंका असल्यास मी स्पष्टीकरण देण्यासाठी तयार आहे. उपनिवडणुकीच्या मैदानातही खुल्या चर्चेला तयार आहे. मात्र केवळ राजकारणासाठी अर्थसंकल्पाची पवित्रता खराब करू नये,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य दिवाळखोरीत असल्याच्या आरोपांमागे भाजप नेत्यांची असहाय्यता आणि असूया असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की, “कोणत्याही विभागाला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास अडचण नाही. आमचे सरकार आर्थिकदृष्ट्या आणि राजकीयदृष्ट्या सक्षम आहे.”
केंद्रापेक्षा राज्याची आर्थिक स्थिती चांगली
मुख्यमंत्र्यांनी दावा केला की कर्नाटकची आर्थिक स्थिती केंद्र सरकारपेक्षा अधिक मजबूत आहे. “या वर्षीचा राज्याचा अर्थसंकल्प ४,४८,००४ कोटी रुपयांचा असून तो मागील वर्षापेक्षा ३८,४५५ कोटींनी अधिक आहे. म्हणजेच ९.४ टक्के वाढ झाली आहे. तर केंद्राच्या अर्थसंकल्पात फक्त ५.६ टक्के वाढ झाली आहे,” असे त्यांनी नमूद केले.
कर्जाबाबत स्पष्ट भूमिका
“कर्ज घेऊ नये असे मी कधीही म्हटले नाही. विकसित अर्थव्यवस्थांमध्ये कर्ज असतेच. मात्र ते पायाभूत सुविधा आणि आर्थिक उपक्रमांसाठी वापरल्यास त्यातून थेट आणि अप्रत्यक्ष लाभ मिळून अर्थव्यवस्था अधिक बळकट होते,” असे त्यांनी सांगितले.
भाजप शासित केंद्र व राज्यांच्या अर्थकारणाचा बारकाईने अभ्यास केल्यास कोण अर्थव्यवस्थेला संकटात ढकलत आहे हे स्पष्ट होईल, असे म्हणत त्यांनी विजयेंद्र यांना “होमवर्क करून मगच बोलावे” असा टोला लगावला.
आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका जाहीर करा – विजयेंद्र
कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्याच्या आर्थिक स्थितीचे वास्तव चित्र जनतेसमोर मांडावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार बी.वाय. विजयेंद्र यांनी केली.
माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेस सरकारवर टीका करत म्हटले की, सत्तेत येऊन तीन वर्षे झाली तरी रिक्त पदे भरण्याचे आश्वासन पूर्ण झालेले नाही. सुमारे २.८६ लाख पदे रिक्त असल्यामुळे युवकांना आंदोलन करावे लागत आहे, असे त्यांनी सांगितले.
धारवाडमधील आंदोलनावेळी लाठीमार झाल्याचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर सत्य लपवण्याचा आरोप केला. गॅरंटी योजनांसाठी निधी उभारता न आल्यामुळे भरती प्रक्रिया पुढे ढकलली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मंड्या जिल्ह्यात स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांना मिळणारी पेन्शन १० महिन्यांपासून थांबली आहे, तसेच अतिथी व्याख्यात्यांना दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणले. पोलिसांनाही वेळेवर पगार देण्यात अडचणी येत असल्याचा दावा त्यांनी केला.
तुंगभद्रा धरणाच्या गेट दुरुस्ती प्रकरणातही राज्य सरकारवर त्यांनी टीका केली. तसेच मुख्यमंत्री बागलकोट येथे पाच दिवस मुक्काम करत असल्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
आता तरी उशीर न करता राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी विजयेंद्र यांनी केली.
Belgaum Varta Belgaum Varta